Saturday, August 30, 2014

नभाखालती अथांग


#मराठी

नभाखालती अथांग
वेड्या वळणाच्या वाटा
दर्याखोर्या पहाडांशी
काळ्या अंधाराच्या लाटा

वाट चालायची दूर
कुठे दिसेना सावली
मला टाकून एकटी
कुठे हरवून गेली

होता सकाळ पाठीशी
मध्यान्हीला पावलात
आता दिवस ढळता
कुठे विरली नभात

शोधशोधले किती मी
चोहिकडे आसपास
उगा चाहुलीचे तिच्या
खोटे खोटेच आभास

खोल मनाच्या तळात
हाक अवचित आली
आणि माझीच सावली
मला तिंथे गवसली

~ वर्षा
https://www.facebook.com/varsha.kulkarni.1840

Friday, August 29, 2014

कितीसा असा उरणार आहे


#मराठी

कितीसा असा उरणार आहे
दाटूनच आलाय तो बरसणार आहे..
कर्कश त्याचा वावर आहे..
सोसलं जे वसूल करणार आहे..
पावसाला पाऊस म्हणाव की नाही..
ही शंका आज असुरी काही
भावना त्याच्या मनात आहे..
भोगून बसला तो केव्हाचा
आता भिजवून भोग देत आहे..
मळभ दाटलेल मनातल कधीच
जणू आजच रित करणार आहे..
कदाचित मन दुखावल त्याच कुणी
तो आजच फक्त रडणार आहे..
ओसरताना वाढत हा दुखाचा नियम आहे..
तो ह्याच तत्वावर अडला आहे..
आज तो फक्त बरसतो आहे..
आत्मशांतिसाठी..
कदाचित त्याच दुःख उदया निवळणार आहे..

©मी शब्दसखा
https://www.facebook.com/Me.Shabdasakha

Thursday, August 28, 2014

तो यथेच्छ बरसत होता


#मराठी

तो यथेच्छ बरसत होता
मी एका आडोशाला होतो
छत्रीची उघडझाप करत
स्वत:लाच सावरत होतो

तो यथेच्छ बरसत होता
रस्त्यावर कोणीच नव्हतं
चहूकडे अंधार पसरलेला
काहीच दिसत नव्हतं

तो यथेच्छ बरसत होता
मी थोडं पुढे सरसवत होतो
चिखलातून चालत
माझा मार्ग शोधत होतो

तो यथेच्छ बरसत होता
मी त्याला धुडकारुन चालू लागलो
त्याचा वेग अजुनंच वाढला
मी त्याच्याशी लपंडाव खेळू लागलो

तो यथेच्छ बरसत होता
मला माझं घर दिसलं
आता घरी पोहोचणार तोच्
विजेंच्या कडकडाटाने मला घेरलं

तो यथेच्छ बरसत होता
एव्हाना मी घरी आलो होतो
त्याच्या परतीची वाट पाहून
मीच घरी परतलो होतो

तो यथेच्छ बरसत होता
त्याला अडवणारं कोणी नव्हतं
तो स्वत:च्याच अंगणात बागडत होता
त्याला जाब विचारणारं कोणी नव्हतं

तो यथेच्छ बरसत होता !!!!!

©:::: ::: :: प्रथमेश सुरेश शिरसाट
https://www.facebook.com/prathmesh.shirsat21071988

Wednesday, August 27, 2014

आता मी


#मराठी

आता मी
======
आता मी -
मन कठोर करायचं ठरवलंय...
आता मी -
तुला विसरायचं ठरवलंय …

मी बोलायचं,तू टाळायचं
हे नेहमीचं-
आता मी -
गप्प गप्प रहायचं ठरवलंय …

तुझा तोरा,तुझा गर्व
याची नको चिंता
आता मी -
स्वत: गर्वात राहायचं ठरवलंय

बदलणे हा तुझा स्थायीभाव आहे ,
असू दे!
आता मी -
स्वत:लाच बदलायचं ठरवलंय…

आता मी
मन कठोर करायचं ठरवलंय...
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
©प्रकाश पाटील,वसई.
https://www.facebook.com/PrakashVasai

Tuesday, August 26, 2014

तृप्ती शोधतो आहे


#मराठी

तृप्ती शोधतो आहे

पंचतारांकित चवीला भोगतो आहे
भाकरी पिठल्यात तृप्ती शोधतो आहे

अंतरी भक्ती नसोनी, रोज जगदंबे,
पोट भरण्या जोगवा मी मागतो आहे

का मनाची व्यर्थ केली स्वच्छता इतकी?
आज जो तो चेहर्‍याला पाहतो आहे

मंदिरी जो कैद आहे देव, त्याला मी
का अजूनी सर्वसाक्षी मानतो आहे?

साजरा फादर्स डे करतोस का पोरा?
दान पिंडाचे मृतात्मा मागतो आहे

वाट नाही पाहिली केंव्हा कुणी ज्याची
त्या भणंगालाच मृत्यू टाळतो आहे

रोजचे घटतेच आहे मुल्य पैशांचे
छापल्या नोटात गांधी हासतो आहे

मनसुबे ऐकून घरचे, स्त्री भ्रुणालाही
जन्म श्वानाचा हवासा वाटतो आहे

मुखवट्यांवर भाळला "निशिकांत" इतका की
चोरही साधूच त्याला भासतो आहे

निशिकांत देशपांडे.
https://www.facebook.com/nishikant.deshpande.7

धुंदीत कोणत्या चंद्रबिंब पाण्यात घसरले आहे



#मराठी

" निशा "

धुंदीत कोणत्या चंद्रबिंब पाण्यात घसरले आहे
चांदणे चमकणे रोजसारखे आज विसरले आहे
धडपडतो ओला चंद्र कसा तीरावर येण्यासाठी
वाहत्या नदीपात्रात कधीचे क्षीर पसरले आहे...

वार्‍यात सुवासित कैक फ़ुलांचा गंध साठला आहे
खडकातून कोसळताच पांढरा झरा गोठला आहे
आवाज गरजतो मंजुळ ज्यांचा अवघ्या रानामध्ये
फ़ांदीवर कोकिळ पक्षांनी संसार थाटला आहे...

वेंधळ्या वेडसर चंद्राला ढग शोधत आले खाली
त्या ढाळावरती पायवाट झालेली आहे ओली
सांभाळून तोल ढगांना काही येणे जमले नाही
वाटेत कलंडले येताना चांगलीच धांदल झाली...

साकळले अल्लड थेंब दवांचे हलत्या पानांवरती
चंदेरी चादर अंथरली अविचल पाषाणांवरती
धावली हवेची झुळूक वनातून हलके पाऊल टाकित
वाजती पैंजणे जशी तसा ध्वनी आला कानांवरती...

अदृश्य चंद्र पाहुनी घराशी परतून गेले तारे
जांभळे निळे आकाश रिकामे झाले आहे सारे
पाण्यात चंद्रमा तोवर खांद्यापर्यंत बुडला होता
झाडावर शोधून थकलेले झोपले मेघ बिचारे...

~ संतोष वाटपाडे (नाशिक)
https://www.facebook.com/swatpade

Fb Page : काव्यसंतोष
Blog : http://santoshwatpade.blogspot.in/

तुझा… किंचीतसा अबोला ही

#मराठी

तुझा…
किंचीतसा अबोला ही
मला…
सहन होत नाही,
हे माहीत असतानाही
तु अबोला धरलायंस…
मी…
फार विचार नाही करणार…
नाहीतर पुन्हा
मी तुला तोलत रहातो,
असं वाटेल तुला…
नक्की काय चुकलं,
कुणाचं चुकलं…
हे प्रश्न नकोच आहेत,
तु… तुला हवा तितका वेळ घे…
मी मानलंय
चुक माझीच असेल…
तसा मीच चुकतो नेहमी…
पण…
आता आणखी हा अबोला नको…
- सुरज उतेकर
https://www.facebook.com/suraj.utekar.12

मी कुठे ग म्हणतो थांब जरा

#मराठी

मी कुठे ग म्हणतो थांब जरा
काकुडतो विव्हाळतो गजरा !

कधी आड रानी भेटून गडे
चौकात उगी गडतात नजरा !

डोळ्यात तुझ्या गंभीर काही
जरी चेहरा तुझा असे हासरा !

चल सोड भय , चिंता करूदे जगा
यौवनाचा सोहळा करू साजरा !

~ डॉ. अविनाश बी .पाटील
https://www.facebook.com/Dr.Avinash.BHMS

Monday, August 25, 2014

तू निघून गेल्यानंतर आयुष्यात


#मराठी

तू निघून गेल्यानंतर आयुष्यात उरलं तरी काय???
.
.
मध्यरात्री अचानक येणारी जाग..
घरभर पसरलेला गच्च अंधार...
विचारांची त्रासदायक खळबळ..
नुसती जीवघेणी तळमळ...
डोळ्यांची संततधार...
नको त्या आठवणींची सरबत्ती..
आतून वाटणारं संपलेपण...
सगळं निर्जीव होउन गेलेलं..

जीव जाण्याआधी तरी थांबेल का हे द्वंद्व...?

- यामिनी
https://www.facebook.com/yamini.dalvi.9

आयुष्य हे जगण्यासाठी असते






#मराठी 

आयुष्य हे जगण्यासाठी असते
जगणे हे विचारांसाठी असते
विचार हे कामासाठी असतात
काम हे परोपकारासाठी असावे
परोपकार आयुष्याला निर्मळ ठेवते

निर्मळ आयुष्य जगणे ---
म्हणजे परमानंद साधने

(वसंताजोबा)
https://www.facebook.com/vasantajoba.creativeartist

Sunday, August 24, 2014

"माझी मर्‍हाठमोळी भाषा"



#मराठी

"माझी मर्‍हाठमोळी भाषा"

माझ्या मर्‍हाठी मातीला
गंध भक्तीच्या फुलांचा |
ज्ञ|ना-तुकाने लावला
वेलू ओव्या-अभंगाचा ||

माझ्या मर्‍हाठी झेंड्याची
ढाल जिजाई खंबीर |
शिवबाच्या बाण्याम्होरं
तुके वैर्‍याचा खंजीर ||

माझ्या मर्‍हाठीची गोडी
नसा नसात भिनते |
साता समुद्रा पल्याड
वारू मर्‍हाठी दौडते||

मानी मर्‍हाठी ज्योतीला
छेडू नका कंदी कंदी |
शे-शे मशालींची आग
एका एका वाती मंदी ||

मर्‍हाठमोळी ही भाषा
सार्‍या विश्वात नांदते |
तरी लहू मर्‍हाठीचे
तीन रंगात रंगते ||

लहू मर्‍हाठीचे
तीन रंगात रंगते ||

-रेणुका खटावकर (रेपाळ)...
१२/९/२००८
(juni kavita navyane)
https://www.facebook.com/renu.khatavkar

काव्यतरंग मीमराठी उपक्रम




#काव्यतरंग #मीमराठी उपक्रम
एक कवी एक कविता

===============

काव्यतरंग मी मराठी उपक्रम #काव्यतरंग
एक कवी/कवयित्री एक कविता
#Marathi #Poem #काव्यतरंग #मराठी

Saturday, August 23, 2014

आतच माझ्या मैफल सजली


#मराठी

आतच माझ्या मैफल सजली
काना डोळ्याविना ऐकली

झोपेमध्ये कोण कुणाचे !
अनोळखी पण स्वप्ने रमली

अविचारांशी सलगी झाली
दुःखे माझ्या पदरी पडली

--- अरविंद
https://www.facebook.com/profile.php?id=1158110075

Thursday, August 21, 2014

जोगतीण


#मराठी

जोगतीण

तुझ्या छत्रा
खाली…….
माझं शरीर
माझ मन
कुस्करल जात
तुझ्या नावा
मागे…….
माझ्या जखमा
तुला वहिल्या
जातात……
तुझ्या भंडाऱ्या
प्रमाणे……
माझ्या वेदनां
गावाच्या पारावर
उधळल्या
जातात

निल
https://www.facebook.com/balagorale

Tuesday, August 19, 2014

वेदनांचे पक्षी


#मराठी

वेदनांचे पक्षी

सारे निशब्दाचे घाव
उरी ओल्या हांका देती
बांगड्याच्या किणकिणीचे
मग साद ऐकु येती

तु जाताना इतक्या दुर
न विचारले तुझे कसे होईल
पुरात सोडुन माझी होडी
तु लागली किना-यावर

तु करुन गेलिस खुण
माझ्याच ह्र्दयावरती
वेदनांचे मग पक्षी
बांधतात तिथेच घरटी....

सुधाकर —
https://www.facebook.com/sudhakar.kulkarni1

Sunday, August 10, 2014

मृत्यू यावा शत्रू सोबत लढता लढता

#मराठी

मृत्यू यावा शत्रू सोबत लढता लढता 
बोले शेखर किल्ल्यावरती चढता चढता 

एका सुद्धा मतदानाला किंमत असते
निवडून येतो असाच कोणी पडता पडता

तोही हसतो तीही हसते पुढे न काही
संपून जाते अशी कहाणी घडता घडता

तुझ्या अंगणी झाड एकही नाही राजा
बोलून गेले एक पाखरू उडता उडता

जिगरबाज ना हरतो कधीही हींमत येथे
हजार वेळा पडते मुंगी चढता चढता
. . . . . शेखर गिरी
https://www.facebook.com/shekhar.giri.37

Friday, August 8, 2014

तुझी सावली होऊन राहावं आयुष्यभर


#मराठी

तुझी सावली होऊन राहावं आयुष्यभर

'तुझी सावली होऊन'* राहावं आयुष्यभर
हेच तर स्वप्न होतं माझं
पण आताशा
हे स्वप्नच लादलं जातंय माझ्यावर
असंच वाटत राहत अधूनमधून …

पूर्वी तुझी सावली पडायची
योग्य दिशेला आणि योग्य उंचीची
आताशा
ओढाताण होते माझी
तुझ्या सोबत अडजस्ट होताना !

मध्यानिलाही आताशा सावली पडते लांबलचक
अन सुर्य अस्ताला जाताना घुटमळते पायात.
कधी कधी दिवसा उजेडात …
मीच मला शोधत फिरते
आणि रात्रीच्या गर्भ अंधारात
थैमान घालतात सावल्या
एकीच्या दोन आणि
दोन्हीच्या अगणित होवून !

मी पाहिलं होतं स्वप्न
विश्वासाचं, विश्वासानं
तुझ्या सावलीच्या रुपात

माझीच मला होतेय सध्या दिशाभूल
तुझ्या वेगाचाहि येत नाही अंदाज
म्हणून ….
आताशा तुझ्या सोबत असले तरी
तुझी सावली होऊन राहणं
जमेलच असं वाटत नाही !

- रमेश ठोंबरे
https://www.facebook.com/ramesh.thombre.9
Blog : http://www.rameshthombre.com/