Sunday, February 17, 2013

बघ माझी आठवण येते का?

मुसळधार पाऊस खिडकित उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळं पिउन टाक ,
बघ माझी आठवण येते का ?

वारयाने उडणारे पावसाचे थेंब चेहर्यावर घे,
डोळे मिटून घे, तल्लीन हो ,
नाहीच जाणवल काही तर बाहेर पड,
समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच,
पाण्यात पाय बुडवून उभी रहा, वाळू सरकेल पायाखाली,
बघ माझी आठवण येते का?

मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे,
चालत रहा पाऊस थांबेपर्यत,
तो थांबणार नाहीच, शेवटी घरी ये,
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस,
पुन्हा त्याच खिडकीत ये, आता नवर्याची वाट बघत,
बघ माझी आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल,
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल,
तो विचारेल तुला तुझ्या भिजण्याचा कारण,
तू म्हणं घर गळतयं, मग चहा कर, तूही घे ,
तो उठून पंकज उधास लावेल, तू तो बंद कर,
किशोरीच सहेलारे लाव,
बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं,
विजांचा कडकडाट होईल, ढ़गांचा गडगडाट होईल,
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्या शरीराकडे बघ,
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस,
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर ,
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर ,
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी,
बघ माझी आठवण येते का?
-सौमित्र

Saturday, February 16, 2013

सुरकुतलेले गाल, अन थरथरणारे हात



सुरकुतलेले गाल, अन थरथरणारे हात,
खोल गेलेले डोळे अन पडून गेलेले दात!
पण पाठीवर हात ठेवता, मिटते सारी काळजी,
लाडक्या या नाताची, लाडकी माझी आजी!

आजीच्या हाताची चव लय लय भारी,
पोट भरेपर्यंत मग ती स्वःता मला चारी!
हॉटेल मधल्या पिझ्झाला तिची चव नाही,
भूक लागल्यावर चारायला आता ती नाही!

आईच अन आजीच मात्र कधीच पटत नाही,
एकदातरी भांडल्याशिवाय दिवस जात नाही!
बाबांनी ओरडल्यावर मात्र आई रडत बसते,
तेव्हा मात्र स्वःता हि तिचे डोळे पुसते!

आजीची माझ्या गोधडी सतरा ठिकाणी फाटलेली,
तरीसुद्धा मायेने ओतप्रोत भरलेली!
बेडवरच्या गादीवर झोप मला येत नाही!
पाणावलेले डोळे मग गोधडी तुझी शोधत राही!

आजीचा माझ्या जीव सगळ्या तिच्या लेकरांवर,
गोठ्यामधली गाई अन कोंबडीच्या पिल्लावर!
सगळ्यांचीच नेहमी करत बसणार काळजी,
लाडक्या या नाताची, लाडकी माझी आजी!

माझ्यावर माझी आजी जीवापाड प्रेम करायची,
शब्द पडण्यापूर्वीच इच्छा पूर्ण करायची!
त्या दिवशी मात्र तिन माझ ऐकलं नाही,
हाका मारून रडलो तरी साद दिली नाही!

रडून रडून नंतर डोळे गेले थकून,
आजी माझी गेली आयुष्यातून निघून!
लाडक्या तिच्या नाताला एकटच माग सोडून,
आजी माझी गेली देवाकडे निघून!

देवाने अस का केल मला माहिती आहे,
माझ्याइतकाच तोसुद्धा प्रेमाचा भुकेला आहे!
ए देवा, आजीला माझ्या नेहमी सुखात ठेवायचं,
पुढच्या जन्मीसुद्धा तिलाच तू पाठवायचं!
-अनामिक 

Friday, February 15, 2013

Thursday, February 14, 2013

ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी



ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी

तशी तू हलके बोल ना
आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके
सुख हे नवे सलगी करे, का सांग ना

सारे जुने दुवे, जळती जसे दिवे
पाण्यावरी जरा सोडून देऊया

माझी ही आर्जवे, पसरून काजवे
जातील या नव्या वाटेवरी तुझ्या

रस्ता नवा शोधू जरा, हातात हात दे
पुसुया जुन्या पाउल खुणा
सोबत तुझी साथ दे

वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे

डोळ्यातल्या सरी विसरून ये घरी
ओळख आता खरी होऊन जाऊ दे

सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला

ओल्या सांज वेळी (प्रेमाची गोष्ट)
म्यूज़िक डाइरेक्टर :- अविनाश - विश्वजीत
गीतकार :- अश्विनी शेंडे
गायक:-स्वप्निल , बेला शेंडे

Like This Page
[ https://www.facebook.com/mybolimarathi ]

Thursday, February 7, 2013

आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यात ऑडिओ बुक्सची चलती

आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यात ऑडिओ बुक्सची चलती
सौजन्य :महाराष्ट्र टाइम्स 

पुस्तके आता वाचतच बसायला हवी , अशी आवश्यकता नाही . बसल्या जागी फक्त ते ऐकायला वेळ काढा . श्राव्य ( ऑडिओ ) पुस्तकांमुळे ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली आहे .

दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यात यंदा लक्षावधी छापील व ई - पुस्तकांच्या गर्दीत , सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र ठरला आहे हॉल क्रमांक एक मधला ' रिडो डॉट कॉम ' चा स्टॉल . जिथे पाच हजारांहून अधिक पुस्तके ऑडिओ स्वरुपात उपलब्ध आहेत .

पाश्चात्य देशात ऑडिओ बुक्स ही संकल्पना वेगाने लोकप्रिय होते आहे . भारतात मात्र हा प्रयोग नवा आहे . ' रिडो डॉट कॉम ' च्या स्टॉलवर सर्वाधिक लोकप्रिय पुस्तक ठरले आहे चाणक्य नीती . याखेरीज खुशवंतसिंग यांचे ' द कंपनी ऑफ विमेन ', ' डोंगरी टू दुबई ', ' द हॅबिट ऑफ विनिंग ', ' द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा ', ' द सेव्हन हॅबिट्स ' आदी ऑडिओ पुस्तकेही लोकांच्या पसंतीला उतरली आहेत . लवकरच अधिकाधिक भारतीय पुस्तके ऑडिओ फॉर्ममध्ये उपलब्ध होतील , असे कंपनीचे सीईओ सुमित सुनेजा म्हणाले .

अनेक जण हौसेने पुस्तके खरेदी करतात . मात्र वाचायला वेळ नाही , अशी खंत व्यक्त करताना दिसतात . अशा लोकांसाठी ऑडिओ बुक्स ही संकल्पना अत्यंत प्रभावी ठरणार आहे . इतके दिवस अनेकांना आपण मोबाइलवर गाणी अथवा संगीत ऐकताना पहायचो . आता मोबाइल अथवा टॅबलेटवर पूर्ण पुस्तक लोड करणे अवघड नाही . बस , लोकल अथवा मेट्रोच्या प्रवासात , कानाला छानसा हेडफोन अथवा छोटे स्पीकर्स लावून आता अख्खे पुस्तक ऐकता येईल .

मराठी मेळा
दिल्लीच्या प्रगती मैदानावर येत्या १० फेब्रुवारीपर्यंत आयोजित आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळयात इमारत क्रमांक १४ मध्ये दालन क्रमांक ८७ व ८८ मराठी पुस्तके व ग्रंथांनी सज्ज आहेत . नामवंत लेखकांची गाजलेली अधिकाधिक मराठी पुस्तके या मेळ्यात वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी मराठी प्रकाशक परिषद व अ . भा . मराठी प्रकाशक संघ या दोन संस्था विशेष प्रयत्न करीत असतात . दिल्लीकरांनी ताज्या मराठी पुस्तकांचा , ग्रंथांचा व प्रकाशनांचा लाभ घ्यावा , असे आवाहन या संस्थांचे पदाधिकारी रमेश कुंटूर , अरविंद पाटकर , व अरुण जाखडे यांनी केले आहे .

Saturday, February 2, 2013

वडिलांना मदत

बोधकथा - २
वडिलांना मदत


भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता.

ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणा-या - जाणा-या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते.

तो म्हणाला, सा-या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो.

आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सा-या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली.

Friday, February 1, 2013

बालपण खरच छान असतं

बालपण खरच छान असतं
सारं जग कसं मोकळं रान असतं
त्या चिमुकल्या पंखांना
आभाळ देखील लहान असतं

बालपण खरच छान असतं .....

आईचं धरलेलं बोट
जगाचं एक एक टोक असतं
माउलीच्या कुशी मध्ये
आपलं सारं ब्रम्हांड वसतं

बालपण खरच छान असतं .....

आईचा पदर हेच आपलं
आभाळ असतं
आभाळ गवसण्या आभाळ
देखील लहान असतं

बालपण खरच छान असतं .....

-श्रीकांत राजेंद्रकुमार देशमाने !!