Wednesday, December 30, 2020

मोठी त्याची सावली


मोठी त्याची सावली : भाग ७
- - - - - - -
प्रतिभेच्या उगमापाशी...

"तळ्याकाठचं गवत
तळ्याशी सलगीनं वागायचं
कारण त्याला जगायला
तळ्याचं पाणी लागायचं"
अशा शब्दांत जगाचा आपमतलबीपणा मांडताना "मिठी या शब्दात किती मिठास आहे, नुसता उच्चारला तरी कृतीचा भास आहे", असा तरल शृंगारही चंद्रशेखर गोखले यांनी मांडला. त्यांच्या अर्थगर्भी चारोळ्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस नादावला. निर्मितीच्या यशानंतर चंद्रशेखर गोखले यांच्या वाट्याला आभाळभर मानसन्मान आला...! पण प्रतिभेच्या उगमापाशी होती पराकोटीची अवहेलना आणि अस्थिरता!
गोखलेंच्या काव्यातूनही त्यांचं सोसलेपण बोलकं होतं. आयुष्यानं पोरवयातच बरंच काही शिकवलं. आपण शिक्षणाच्या फळीवर फार काही करू शकणार नाही, ही बोचरी जाणीवदेखील! मात्र त्यांनी परिस्थितीचा निमूटपणे स्वीकार केला. आपणहूनच त्यानं वर्गाच्या अगदी शेवटच्या बाकावरला एक कोपरा धरला. पण दोन गोष्टी आतल्याआत सुरू होत्या 'चिंतन' आणि 'चित्रकारी'. भोवतालच्या घटनांचा त्यांच्या मनावर होणारा परिणाम व्यक्त व्हायला प्रवृत्त करायचा. मध्यमवर्गीय पांढरपेशा कुटुंबात जन्माला आलेला तो. तीन बहिणींच्या पाठीवर चौथा मुलगा. मुलांनी शिकण्याशिवाय तरणोपाय नाही, या विचाराशी बांधलेलं घर होतं त्याचं. कला बिला सगळं काही नंतर..! वडिलांचं एक वाक्य तो कायम स्मरणात ठेऊन होता, "शिकला नाहीस तर कॉलनीतल्या साठेंच्या किराणा दुकानात पुड्या बांधायला पाठवीन." तेव्हापासून साठ्यांच्या दुकानासमोरून जातानाही तो धास्तावलेला असायचा.
तो जे. जे. आर्ट्स स्कूलमध्ये दाखल झाला. त्याचं कागदावर व्यक्त होणं घरात रुचायचं नाही फारसं. त्यातून वाद व्हायचे. पुढं पुढं कुरबुरी इतक्या वाढल्या की त्याचं हळुवार मन दुखावलं जायचं. अगदीच नाईलाज झाल्यानं एक दिवस घर सोडावं लागलं. मोठ्या बहिणीनं आश्रय दिला आणि सोबतच विचार आणि कृतीचं स्वातंत्र्यही! एकदा लहानग्या भाचीला अंघोळ घालून देताना तिच्या हातातली बाहुली पाण्याच्या टबात पडली. ताठरलेले हात-पाय...छताकडं लागलेले डोळे... आणि पाण्याच्या  पृष्ठभागावर विखुरलेले बाहुलीचे केस... निर्जीव बाहुलीच ती. पण ते दृश्य पाहून तो कमालीचा अस्वस्थ झाला आणि आयुष्यातली पहिली चारोळी जन्माला आली...
"पाण्याचं वागणं
किती विसंगत
पोहणाऱ्याला बुडवून
प्रेताला ठेवतं तरंगत"
घर सोडल्यानंतरचा प्रसंग. एका संध्याकाळी तो 'जेजे'तून बाहेर पडला. बाहेर पावसाची रिपरिप चालली होती. पुस्तकं डोक्यावर धरून पावसाचे थेंब अंगावर झेलत तो आपल्याच तंद्रीत घराकडे निघाला. पावलं वळतील तसा तसा! ती कुठं पडतायत हेही कळत नव्हतं त्याला. घराच्या फाटकापाशी आला आणि एकाएकी भान आलं. जे घर कधीचंच सोडलं आहे तिथं येऊन पोहोचलो आहोत आपण. पावलं थबकली आणि मागं वळली. सख्ख्या नात्यांमधली दरी जरा अधिकच रुंद भासली त्याला. डोळे डब्ब भरून आले आणि त्या भावनेनं एका अजरामर चारोळीचं रूप घेतलं...
"पुसणारं कुणी असेल तर
डोळे भरून यायला अर्थ आहे
रडणारंच कुणी नसेल तर
मरणही व्यर्थ आहे"
लग्न करायचंच नाही, हे त्याचं जवळपास ठरलं होतं. एक दिवस एका मित्रानं सांगितलं, "तुझ्या कवितांची एक चाहती आहे. तुला भेटायचं म्हणतेय ती." तिच्याशी भेट झाली. पुढे उलगडा झाला की तिला भेटायला आणताना मात्र "हे तुझ्याकरता आलेलं स्थळ आहे", असं सांगितलं गेलं होतं. रीतसर पसंती झाली आणि लग्न उरकलं. 'उमा' नावाची अत्यंत समजूतदार मुलगी आयुष्यात आली. "शेखर, तू लिहीत रहा. वाटल्यास मी लोकांसाठी भाजी- पोळ्या करून विकेन", असं म्हणणाऱ्या अर्धांगिनीनं त्यांच्या अडचणीच्या काळात आपला शब्द खरा केला. हा समंजसपणाचा भाव त्यांच्या एका कवितेतून असा उमटला..."घर दोघांचं असतं ते दोघांनी सावरायचं...एकानं पसरवलं तर दुसऱ्यानं आवरायचं". आता चंद्रशेखर गोखले छानपैकी स्थिरावले आहेत. जगाच्या पाठीवर त्यांच्या चारोळ्यांचे कोट्यवधी चाहते आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत करियरसाठी धडपडणाऱ्या होतकरूंचे मॉडेल को-ऑर्डीनेटर, मालिकांचे संवादलेखक, कथालेखक अशा विविध रुपांत ते आपल्याला भेटतात. सौभाग्यवती उमा गोखले मालिकांच्या जगातली प्रेमळ आई आणि समंजस काकू किंवा मावशीच्या रुपात बघायला मिळतात. मराठी कवितेच्या प्रांतात गोखल्यांनी इतिहास घडवला. "मी माझा"संग्रहाच्या लाखो प्रती खपल्या. इतर भाषेत रूपांतरित झाल्या. "मराठी चारोळीचा जनक" ही बिरुदावली ते विनयपूर्वक हसून अमान्य करतात, हे गोखलेंचं मोठेपण आहे. दिवस निघून जातात... जखमा साकळतात...उरलेले व्रण मात्र जन्माची सोबत करतात. अजूनही कधीतरी कातरवेळी जुन्या आठवांनी त्यांचा स्वर कापरा होतो... डोळे भरून येतात...काही क्षण निःशब्द जातात... पुन्हा चारोळीकार चंद्रशेखर गोखलेंच्या चेहऱ्यावर हसू विलसतं... "मी माझा"संग्रहाच्या मुखपृष्ठावरच्या फोटोतल्यासारखं...!
© नितीन भट

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3986990831386283&id=100002262164906