Tuesday, January 17, 2017

पु ल

नंदा जगण्यासाठी काय उद्योग करीत होता याची मात्र मला कल्पना नव्हती. भली मोठी मोटारगाडी होती. ताजमध्ये राहायचा. कदाचित बापाची प्रचंड इस्टेट शाबूत राहिली असेल.
.
आता मात्र आम्ही खूप मोकळेपणाने बोलते होतो. पण मला तो माझ्याबरोबर इतका वेळ का घालवतो याचे कोडे होते. एकदा मला तो ताजमहाल हॉटेलातल्या आपल्या खोलीत घेऊन गेला. ते वातावरण पाहून मी जवळजवळ भेदरूनच गेलो होतो. नंदा मात्र त्या वैभवात अत्यंत अलिप्तपणाने संचार करीत होता.
.
"आज आपल्याला बरोबर जेवायचं आहे."
.
"पण तुमच्या ह्या हॉटेलात जेवण्याचा पोशाख घालावा लागतो."
.
"डोंट वरी! तूच सांगितलंस ना भारत स्वतंत्र झाला म्हणून? तुझा हा वेष चालेल. अरे धोतर कुठंही चालतं!"
.
आणि त्या दिवशी प्रथम इंदू वेलणकर हा विषय निघाला. वीस वर्षापूर्वी ह्याच तारखेला आम्ही मोरेटोरमध्ये जेवायला गेलो होतो. माझ्या लक्षात तारीख नव्हती, नंदाच्या होती. हा योगी पुरूष भुतलाशी असला काही धागा ठेवून राहिला असेल अशी मला कल्पनाही नव्हती!
.
मी त्यांना कॅंपमध्ये सोडल्यानंतरचा सारा इतिहास त्याने मला सांगितला. युद्धाच्या त्या पेटत्या खाईत त्याच्या सर्वस्वाचा असंख्य वेळा नाश झाला होता; फक्त एक गोष्ट टीकून होती. ती त्याने एका पाकिटातून काढून माझ्यापुढे ठेवली! एक फार फार जुने पत्र होते. इंदूचे त्याला आलेले पत्र! इंदूने त्यात आपले अतं:करण मोकळे केले होते. मी पुस्तकातूनच काही प्रेमपत्रे वाचली होती. हे खरेखुरे प्रेमपत्र होते! वीस वर्षापूर्वीची त्याच्यावर तारीख होती. ते पत्र वाचता वाचता माझ्या डोळ्यांतून अश्रूंची धार लागली.
.
" ए वेड्या , रडतोस काय?" नंदा माझे सांत्वान करीत होता.
.
मला एकएकी नंदा वांद्रयाच्या समुद्रात दगड फेकणार्या पोराएवढा लहान वाटू लागला! माझ्या लहान मुलांना मी कुरवाळतो, त्यांची पाठ थोपटतो, त्यांचे मुके घेतो,त्याचे त्याला करावे असे वाटू लागले. पण वाटेल ते करून मन स्वच्छ करायला मी नंदा नव्हतो. कसली कसली सभ्यतेची, शिष्टाचारांची अनेक बंधने घेऊन हिंडणारा मी एक दुबळा कारकून होतो. फक्त माझ्या डोळ्यानी ही बंधने पाळली नाहीत. शेवटी ते पत्र त्याच्या हातात देऊन मी म्हणालो, -
.
" नंदा, जगात देव नाही आहे रे !" "अरे जगात काहीच नाही! ज्या क्षणाला आपण श्वास घेत असतो ना, तेवढा क्षण असतो. ते बघ" - खिडकी बाहेरचा समुद्र दाखवीत मला तो म्हणाला, "तो समुद्र आहे ना ? त्यात आपल्याला काय दिसतं? लाटा दिसतात, त्या बोटी दिसतात. ते कोळी, ती बघ लहान होडी घेऊन निघाले आहेत. त्यांना काय दिसत? फक्त मासे दिसतात. ते आणि मासे - त्यांच्यात येणारी अडचण म्हणजे समुद्र ! जीवन जीवन ज्याला म्हणतात ना , ते आपल्या जन्मापासून मरणापर्यंत नुसतं असं आड येत असत. बाकी काही नसतं! कधी प्रचंड लाटा होऊन येत. कधी उगीचच मठ्ठ्पणानं आडवं पडून राहतं मग कंटाळा येऊ नये म्हणून आपण त्याला लेबल लावतो - प्रेम म्हणतो, बायको म्हणतो, आई म्हणतो, धर्म म्हणतो, देव म्हणतो - काय वाटेल ते म्हणतो. एरवी जीवन म्हणजे एक निरर्थक फसवी,वस्तू आहे, ह्या समुद्रासारखी"
.
"असं का म्हणतोस? इंदूची आठवण तुला होतेच की नाही?"
.
"अरे, तु कोळ्याचं प्रचंड जाळं जेव्हा समुद्रातून ओढून काढतात तेव्हा पाहिलं आहेस? त्या जाळ्यात अडकलेले मासेदेखील तेवढ्यातल्या तेवढ्यात छोट्या मासळीला मट्ट करून गटकावतात. पुअर सोल्स!"

0 comments: