Monday, July 27, 2020

गुरुपौर्णिमेचा शिक्षकांशी संबंध नाही

*गुरुपौर्णिमेचा शिक्षकांशी संबंध नाही* 

हेरंब कुलकर्णी____

अनेक शाळेत गुरुपौर्णिमेला शिक्षक सत्कार केले जातात अनेकजण शिक्षकांना शुभेच्छा देतात..आणि हेच पुन्हा शिक्षक दिनाला ही केले जाते.. एकाच गोष्टीसाठी दोन दिवस कसे असतील ? समजण्यात चूक होते आहे. गुरुपौर्णिमा हा दिवस फक्त अध्यात्मिक मार्गदर्शन केलेल्या किंवा करू शकणाऱ्या गुरू साठी असतो. जो ध्यान शिकवतो व आंतरिक षड्रिपु पासून मुक्तीचा मार्ग दाखवत आंतरिक परिवर्तन करू शकतो तोच गुरू असतो..शिक्षक हा काहीसे या लौकिक जगातील जगण्याचा मार्गदर्शक असतो..तो लौकिक जगण्यात नैतिकता शिकवतो व आध्यत्मिक प्रवासाच्या दारापर्यंत आणून सोडतो..त्यामुळे दोघांचे कार्यक्षेत्र पूर्ण वेगळे आहे तेव्हा शिक्षकांना शिक्षक दिनाला सन्मानित करावे व आध्यत्मिक गुरुला आज।जर असे गुरू आजूबाजूला नसतील तर विविध संत,योगी हे त्या पात्रतेचे आहेत...आपण शिक्षक म्हणजे गुरू असे सुलभीकरण करून गुरू शब्दातील महान आशय मर्यादित करतो असे मला वाटते...संगीत क्षेत्रात गुरू शब्द असाच सोपेपणाने वापरला जातो,पण तिथे केवळ मार्गदर्शक/शिक्षक असेच म्हटले पाहिजे । निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर ते रामकृष्ण विवेकानंद ही परंपरा यांच्यासाठी आजचा दिवस असतो। त्यातही बुद्ध ते कृष्णमूर्ती ही परंपरा अध्यात्मिक विकासाला गुरुची गरज नाही असे मानते..कोणता मार्ग निवडायचा ते व्यक्तीच्या जडणघडणीवर किंवा क्षमतेवर अवलंबून आहे आणि ज्यांना अध्यात्म मान्य नाही त्यांनी हे सर्वच नाकारावे पण एक नक्की शिक्षक म्हणजे गुरू नव्हे ।।
(हेरंब कुलकर्णी)

0 comments: