Saturday, May 28, 2022

post 15

मी कागद झाले आहे.....

अंदमानात असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांना काव्य स्फुरू लागले. 
जवळ कागद नव्हते. 
त्यांनी उष:कालच्या आभाळाला विचारले, 
'माझा कागद होतोस काय?'
आभाळ उत्तरले....
मी मुक्तामधले मुक्त - तू कैद्यांमधला कैदी
माझे नि तुझे व्हायाचे - ते सूर कसे संवादी?
माझ्यावर लिहिती गीते - या मंद-समीरण लहरी
माझ्यावर चित्रित होते - गरूडाची गर्द भरारी
जड लंगर तुझिया पायी - तू पीस कसा होणार?
माझ्याहून आहे योग्य - भूमीला प्रश्न विचार

आभाळ म्हणाले 'नाही' - भूमिही म्हणाली 'नाही'

मग विनायकाने त्यांची - आळवणी केली नाही

पापण्यांत जळली लंका - लाह्यांपरि आसू झाले
उच्चारून होण्याआधी - उच्चाटन शब्दां आले

की जन्म घ्यायच्या वेळी - गंगेस हिमालय नाही
शाई न स्पर्शली असूनी - हे अभंग नदिच्या 'बाही'

(ती पहाट लालम् लाल - अनपेक्षित झाली काळी)
दगडाची पार्थिव भिंत - तो पुढे अकल्पित सरली

'मी कागद झाले आहे - चल ‍‍‍‍‍‍लिही' असे ती वदली........

मित्रांनो, सावरकरांच्या कवितांचा व साहित्य निर्मितीचा इतिहास मोठा रोचक आहे. आराम खुर्चीवर बसून शांतचित्ताने आभाळाकडे पाहात कविता लिहिण्याचे योग सावरकरांच्या नाशिबी नव्हते. 
मार्सेलीसच्या बंदराजवळ मोर्या बोटीतून समुद्रात उडी घेवून सावरकरांनी जगाला आपल्या अतुलनीय धैर्याचा परिचय करून दिला. 

माझे कान पकडण्याचा अधिकार केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनाच असेे ते आत्मविश्वासपूर्वक म्हणायचे. 

औरंगजेबाच्या कैदेतून सहीसलामत निसटण्याचा पराक्रम महाराजांनी केला होता. तो प्रसंग सावरकरांना प्रेरणा देत होता. अचाट शौर्याचा परिचय देत आगबोटीतून निसटलेले सावरकर दुर्दैवाने पकडले गेले. ब्रिटिश शिपायांनी सावरकर चोर असल्याची बतावणी करून त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उलंघन करत फ्रांसच्या भुमीवर अटक केली. सावरकरांच्या बेड्या ठोकलेल्या  शरीरावर जोड्याच्या टाचांचे शिपायांनी प्रहार केले. निसटू न शकल्याचे अपयश पदरी आलेले व शरीरावर जीवघेणे प्रहार सुरु असतांनाही सावरकर डग़मगले नाही. या मृत्युंजयाला तिथेही कविता स्फुरते.. 

अनादी मी, अनंत मी, अवध्य मी भला....
मारिन मज जगती असा रिपू कवण जन्मला !

Fb page @ स्वा.  सावरकर


0 comments: