Thursday, July 10, 2025

चित्रकविता

थकलेल्या आईचा एकदा
बसल्या जागी डोळा लागला
तेंव्हा तिचा छकुला 
अगदी शहाण्या सारखा वागला
हळूच सारली त्याने
तिच्या मानेखाली उशी
अन शालही पांघरली
अगदी ती त्याच्यावर पांघरायची तशी
आईचे डोळे मिटले होते
तरी तिला दिसत होतं सगळं
तिला आपलं बाळ वाटलं
जगापेक्षा वेगळं
मायेनं ओथंबून तिचे
भरून आले डोळे
आणि आई रडते म्हणून तिचे बाळ
कासावीस झाले खुळे
आई आई म्हणत त्याने
गाठली तिची कुशी
कुशीत घेत आईने त्याला दिली
आपल्या हाताची उशी
मग काय ते वेडं बाळ
निवांत निजलं
अन आईच्या पदराचं टोक
ओल्या पापण्यांनी भिजलं.......
#चंगो

0 comments: