Saturday, January 6, 2018

नाटककार विजय तेंडुलकर

नाटककार विजय तेंडुलकर

जानेवारी १९२८- १९ मे २००८

विजय तेंडुलकरांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. प्रारंभीचा बराचसा काळ पुणे, मुंबई येथे गेला. त्यांना आर्थिक अडचणींमुळे महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. प्रारंभीच्या काळात अर्थार्जनासाठी नवभारत, मराठा, लोकसत्ता या दैनिकांत व नवयुग साप्ताहिकात त्यांनी पत्रकारिता केली. ‘वसुधा’ मासिकाचे त्यांनी काही काळ संपादन केले.

तेंडुलकरांची नाटके हा मराठी रंगभूमीवरचा एक स्वतंत्र प्रकार आहे. प्रायोगिक, व्यावसायिक अशा दोन प्रकारांत मराठी नाटक दुभंगले असता तेंडुलकरांनी या दोन्ही प्रकारांचा मध्य गाठणारा ‘तेंडुलकरी नाटक’ नावाचा नवा प्रकार अस्तित्वात आणला. तेंडुलकरांची नाटके कोणत्याही चौकटीत बसवता येत नाहीत, कारण प्रचलित चौकटी झुगारून ती लिहिलेली आहेत. नाटकाकडे पाहण्याच्या त्यांच्या चाकोरीबाह्य दृष्टिकोनाचे चोखंदळ मराठी प्रेक्षकांनी / समीक्षकांनी स्वागत आणि कौतुक केले. सनातनी वर्गाला तेंडुलकर मूर्तिभंजक वाटले. त्यांनी तेंडुलकरांच्या नाटकांवर वेळोवेळी हल्ले चढविले. ओरडा करून त्यांच्यापैकी काहींनी तेंडुलकरांच्या नाटकांवर बंदी घालायची मागणी केली. तेंडुलकरांच्या नाटकावरची या वर्गाची ही प्रतिक्रिया नैसर्गिक होती.

वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर, बाळ कोल्हटकर, जयवंत दळवी ही मंडळी नाट्यवेड्या मराठी मनावर राज्य करत होती. अशा वेळी वर्गात मागच्या बाकावरच्या एखाद्या व्रात्य पोराने आवाज देऊन वर्गाची शिस्त बिघडून टाकावी, तसा तेंडुलकरांचा मराठी रंगभूमीवरचा प्रवेश होता. प्रेक्षकानुनयी नाटकाने मराठी रंगभूमीला आणलेल्या मरगळीवर तेंडुलकरांची नाटके हा जहाल उतारा होता. विषय, रचना आणि आशयात्मक विधान ह्या तिन्ही बाबतींत तेंडुलकरांनी केलेले नाट्यात्मक प्रयोग रंगभूमीला हादरून सोडणारे होते. एकूण २७ नाटके, २५ एकांकिका तेंडुलकरांनी लिहिल्या. याखेरीज आठ – दहा बालनाट्ये लिहिली.

समाजाला धक्का देण्यासाठी तेंडुलकर मुद्दामच काहीतरी खळबळजनक (सेन्सेशनल) लिहितात, असा आरोप काही परंपरावादी करत. तेंडुलकरांच्या नाट्यसंपदेचे हे यथार्थ वर्णन आहे. तेंडुलकरांच्या नाटकातून दिलेले धक्के हे केवळ समाजाला नव्हते तर मराठी रंगभूमीच्या परंपरेला होते. ‘गिधाडे’, ‘बेबी’, ‘सखाराम बाईंडर’, ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकांतून तेंडुलकरांनी मराठी रंगमंचावर ‘अँटी हिरो’ आणले. त्यांच्या नाटकात समाजातल्या सांस्कृतिक दांभिकतेवर हल्ले असायचे. ‘घाशीराम कोतवाल’मध्ये पेशवेकालीन ब्राह्मणवर्गाचे जे चित्र तेंडुलकरांनी केले, त्यामुळे ब्राम्हणवर्ग खवळला; पण आपल्याकडल्या ब्राम्हणवर्गाचे वैशिष्ट्य असे की, त्यात  जसे सनातनी आहेत तसे पुरोगामीही आहेत. या पुरोगामी वर्गाने हे नाटक उचलून धरले. ‘घाशीराम’ मध्ये काम करणारे कलावंत तर बव्हंशी ब्राह्मणच होते.

‘कन्यादान’ मधल्या दलित तरुणाच्या चित्रणाने दलितवर्ग नाराज झाला. लोकानुनय हा शब्द तेंडूलकरांच्या शब्दकोशात नसल्याने तेंडुलकरांनी विरोधाला न जुमानता समाजातल्या बऱ्यावाईट वृत्तींवर आघात करणे चालूच ठेवले.

‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकाचे इंग्रजीसह अनेक भाषांत भाषांतर झाले. नंतर गाजलेल्या इतर नाटकांचीही विविध भाषांत भाषांतरे होत गेली. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ आणि ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकांमुळे तेंडुलकरांचे नाव राष्ट्रीय पातळीवर गेले.

‘सामना’, ‘सिंहासन’, ‘उंबरठा’, या मराठी चित्रपटांबरोबरच श्याम बेनगेल, गोविंद निहलानी यांच्या चित्रपटांसाठी तेंडुलकरांनी पटकथा लिहिल्या. त्यातून ते अमराठी वर्गाला परिचित झाले. ‘गृहस्थ’ हे पहिले नाटक तेंडुलकरांनी विशीत लिहिले. त्यांचे अखेरचे नाटक २००४ सालचे आहे आणि ते इंग्रजी आहे – ‘हिज फिफ्थ वुमन’.

 या दरम्यान ‘श्रीमंत’, ‘मी जिंकलो मी हरलो’, ‘एक हट्टी मुलगी’, ‘अशी पाखरे येती’, ‘गिधाडे’, ‘पाहिजे जातीचे’, ‘कन्यादान’, ‘कमला’ यांसारखी समाजवास्तावर भाष्य करणारी एकाहून एक भेदक नाटके तेंडुलकरांनी रंगभूमीवर आणली. प्रत्येक नाटकाचा विषय वेगळा, आविष्काराची शैली वेगळी. सत्तरीनंतरची पिढी तेंडूलकरांच्या नाट्यक्षेत्रातल्या या विलक्षण कामगिरीने भारून गेली.

नाट्यक्षेत्रातल्या यशाशी तुलना करता ललित वाङ्मय क्षेत्रातल्या तेंडूलकरांच्या कामगिरीकडे मात्र काहीसे दुर्लक्ष झाले, असे म्हणावे लागेल. ‘कोवळी उन्हे’ हे त्यांचे सदर मराठीतल्या ललित लेखनाचा अजोड नमुना आहे. ‘कोवळी उन्हे’ एवढे एकच पुस्तक तेंडुलकरांनी लिहिले असते, तरी ते श्रेष्ठ साहित्यिक म्हणून मान्यता पावले असते, असे म्हटले जाते. ‘रातराणी’ हा दुसरा लेखसंग्रह देखील त्याच तोलमोलाचा आहे. ‘रामप्रहर’ हा अलीकडील संग्रह सत्तरीतही तेंडुलकरांची या माध्यमांवर किती पकड होती, हे दाखवून देतो. ‘कादंबरी-एक’ आणि ‘कादंबरी-दोन’ या शीर्षकांच्या कादंबऱ्यांत त्यांनी मराठी कादंबरी विश्वाला अपरिचित विषय हाताळले. मात्र नाटककार तेंडूलकर या वादळी व्यक्तिमत्त्वाने ललित लेखक तेंडुलकरांचे व्यक्तिमत्त्व झाकोळले. टेनेसी विल्यमच्या बहुचर्चित ‘स्ट्रीट कार नेम्ड डिझायर’ आणि मार्क डोरेनच्या ‘लास्ट डेज ऑफ लिंकन’ या नाटकांचे त्यांनी केलेले ‘वासनाचक्र’ आणि 'लिंकनचे अखेरचे दिवस’ हे अनुवाद वाचक/ प्रेक्षकांसमोर नीटपणे आले नाहीत. मोहन राकेशांचे ‘आधे-अधुरे’ आणि गिरीश कर्नाडांचे ‘तुघलक’ या दोन नाटकांचे तेंडुलकरांनी केलेले अनुवाद तेवढे मराठी रंगभूमीवर चांगल्या प्रकारे सादर झाले.

चित्रपट हे नाटकापेक्षा अधिक व्यापक प्रेक्षकवर्ग असलेले माध्यम आहे. त्याही क्षेत्रात तेंडुलकरांचे खास योगदान आहे. पण टीकाकारांनी त्याची फारशी दाखल घेतली नाही. ‘उंबरठा’, मंथन, ‘आक्रोश’, ‘निशांत’, ‘अर्धसत्य’ यांसारख्या महत्त्वपूर्ण चित्रपटांच्या पटकथा तेंडूलकरांच्या आहेत. त्यांच्यापैकी काही पटकथा पुरस्कारप्राप्त ठरल्या. केतन मेहतांनी सरदार पटेलांच्या जीवनावर काढलेल्या ‘सरदार’ या चित्रपटाची तेंडुलकरांनी लिहिलेली पटकथा हा आदर्श पटकथेचा नमुना मनाला जातो. स्वतः तेंडुलकरांना मात्र त्यांच्या पटकथेवर फार बोलायला आवडत नसे. त्यात बहुधा त्यांना मोकळेपणाने वावरता येत नसावे. दिग्दर्शकांशी, निर्मात्यांशी झालेल्या खडाजंगी वादानंतर झालेल्या तडजोडीतून  त्यांच्या पटकथा आकाराला येत, “माझी एकही पटकथा अजून पडद्यावर आलेली नाही”, असे ते काहीशा उपरोधाने म्हणत.

नाटक, ललित लेख, चित्रपटाच्या पटकथा या दरम्यानही तेंडूलकर वेळात वेळ काढून फिल्म सोसायटीच्या चित्रपटांना हजेरी लावत, नव्या तरुण पोरांची नाटके पाहत, नव्या लेखन मंडळींची पुस्तके; वाचत त्यांना उत्तेजनपर प्रस्तावना लिहून देत. त्यांच्या पुस्तक प्रकाशनांसाठी वक्ते म्हणून उपस्थित राहत.

अखेरच्या दोन दशकांत त्यांच्यावर पुरस्कारांचा, सन्मानांचा वर्षाव झाला. त्यावेळी त्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतांनाही साहित्यिक मूल्य आहे. तरुण मित्रांना त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या दोन – चार ओळींच्या पत्रांतूनही त्यांच्या तल्लख बुद्धीची कल्पना येते. तेंडुलकरांनी लिहिलेल्या या चिठ्ठ्या – चपाट्या पुस्तक रूपाने प्रकाशित झाल्या, तर तेंडूलकरांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाच्या वेगळ्या पैलूवर प्रकाश पडेल, यात शंका नाही.

त्यांना अनेक महत्त्वपूर्ण पुरस्कार लाभले. ‘पद्मविभूषण’ किताब देऊन केंद्र सरकारने त्यांचा गौरव केला. महाराष्ट्र शासनाचे तीन पुरस्कार, सरस्वती सन्मान, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार हे महत्त्वाचे पुरस्कार होत.

-अवधूत परळकर

सौजन्य : आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश 

साहित्य खंड

0 comments: