Friday, February 8, 2019

लेख

प्रवास - एका अदम्य जिद्दीचा, माती, पंख आणि आकाशाचं स्वप्न पहायला शिकवणाऱ्या योध्याचा - ज्ञानेश्वर मुळे

सत्संग करायला म्हातारं व्हावं असा काही नियम नाही. मनात इच्छा असेल तर अगदी ४-६ वर्षांचा लहान मुलगासुद्धा हरिपाठ, भजन, कीर्तन यात दंग होऊन जातो. अगदी त्याचप्रमाणे काही लोकांनी आयुष्यातील एक टप्पा एका नोकरीत यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या महत्वकांक्षी प्रकल्पाकडे जायचं ठरवलं तर त्यात वावगं वाटता कामा नये. विकास या सर्वसमावेशक संकल्पनेविषयी सध्या अनेक वल्गना होत असताना आयुष्यातील दीर्घकाळ प्रशासनात व्यतीत केलेल्या व्यक्तीने राजकारणात येण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक जण त्याला स्वार्थी किंवा आपमतलबी ठरवतात. पण या व्यक्तीने आपला निर्णय आधीच जाहिररित्या सांगून विरोधकांची बोलती बंद केली आहे.

प्रशासन आणि राजकारण ज्याठिकाणी हातात हात घालून पुढे जावं असं आपल्याला वाटतं, त्याठिकाणी ज्ञानेश्वर मुळेंसारखे अधिकारी जन्म घेतात. त्यांचा उदय ही नांदी असते - पर्यायी राजकारणाची. आपण ज्या समाजातून आलेलो असतो, त्या समाजाला वारंवार त्याच त्याच सुधारणांचं आमिष दाखवून राजकारण करणाऱ्या राजकारण्यांपेक्षा ज्ञानेश्वर मुळे हे नक्कीच वेगळे आहेत. लहानपणापासून असलेली अभ्यासाची आवड जोपासत त्यांनी आपला शैक्षणिक प्रवास पूर्ण केला. अनेक शिष्यवृत्ती मिळवत आपल्या ज्ञानाची चुणूक त्यांनी दाखवून दिली. भारतीय विदेश सेवेत निवड झाल्यानंतर जपान, मालदीव, अमेरिका या देशांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. लिखाणाची आवड असल्याने मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत त्यांनी साहित्यनिर्मितीही केली. साप्ताहिक साधनामध्ये त्यांनी लिहलेलं लिखाण विशेष लोकप्रिय आहे. मागील २ वर्षांमध्ये पासपोर्ट सेवा तळागाळातील सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी ज्ञानेश्वर मुळेंनी विशेष परिश्रम घेतले आहेत. यामुळेच देशाचे पासपोर्ट मॅन म्हणूनही ते आता प्रसिद्ध आहेत.

आई-वडील हे भक्तीसंप्रदयातील असल्याने घरात आध्यात्मिक वातावरण पहिल्यापासून असल्याचं मत ज्ञानेश्वर मुळे यांचे ज्येष्ठ बंधू ज्ञानदेव मुळे यांनी व्यक्त केलं. बँक ऑफ बडोदातून निवृत्त झालेले ज्ञानदेव मुळे अब्दुल्लाट मध्येच आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. त्यांच्या घरातील प्रत्येक जण आपापलं काम करुन स्थिरस्थावर झाला आहे. कुणीही कुणाची पुण्याई वापरायची नाही, असा मुळे घराण्याचा दंडकच आहे. ज्ञानेश्वर मुळेंची आई आजही त्याच साधेपणाने सर्वत्र वावरत असते. त्यांच्या चेहऱ्यावरील वात्सल्यपूर्ण भाव एका आईने मुलांना मोठं करताना, त्यांची जडणघडण करताना केलेल्या कष्टाची जाणीव करुन देतात. त्यांच्या चुलतबंधुंचं कपड्याचं दुकान आहे. देव-देवतांसाठी लागणारी वस्त्रे बनविण्याचं काम गेली अनेक वर्षांपासून ते करत आहेत. यासोबत अनिलकुमार मुळे हे त्यांचे दुसरे चुलतबंधू पुण्यातील कंपनीमध्ये कार्यरत आहेत. तर एक बंधू गावातील व पंचक्रोशीतील लोकांसाठी फोटोग्राफीचं काम करतात.

बाकी प्रशासकीय अधिकाऱ्यांसारख्या शेकडो एकर जमिनी मिळवणे, बंगले बांधणे अशा कोणत्याच भौतिक सुखांमध्ये मुळे कुटुंबीय कधीच अडकले नाहीत. हाच त्यांचा साधेपणा त्यांच्या दैनंदिन व्यवहारातूनही पाहू शकतो. स्थानिक लोकप्रतिनिधींशी उत्तम संपर्क असलेले ज्ञानेश्वर मुळे आता कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. हातकणंगले मतदारसंघात त्यांचे विश्वासू सहकारी राजू शेट्टी हे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या विरोधात जाणं हे तूर्तास तरी ज्ञानेश्वर मुळेंना शक्य होणार नाही. साखर कारखानदारी समवेत अनेक महत्वाचे विषय कोल्हापूर भागात अजून दुर्लक्षित आहेत. महाराष्ट्रातील अनेक खासदारांना केवळ भाषिक अडचणीमुळे केंद्रात आपल्या समस्या मांडता येत नाहीत. किंबहुना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा अभ्यासही तुटपुंजा असल्याने विकासाच्या नवीन कल्पना आपल्याकडील ग्रामीण भागात राबविल्या जात नाहीत. अशा वेळी ज्ञानेश्वर मुळे यांच्यासारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा फायदा मतदारसंघातील लोकांना झाल्याशिवाय राहणार नाही. गरज आहे फक्त डोळसपणे राजकारणाकडे पाहण्याची - आणि योग्य माणसाची पारख करण्याची..!!

- साभार योगेश जगताप, पत्रकार सातारा.

0 comments: