Saturday, March 19, 2022

post 2

एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये याला काही उत्तर नाही. पंधरा पंधरा वीस वीस वर्षांच्या परिचयाची माणसं असतात पण शिष्टाचाराची थोडीशी घडी मोडावी या पलिकडे त्यांचा आपला कधी संबंध जात नाही. त्यांच्या घरी आपलं येणं जाणं होतं, बोलणं चालणं होत, पण भेटी झाल्या म्हणून मनाच्या गाठी काही पडत नाहीत. तर काही माणसं क्षणभरात अनेक वर्षांचा दुवा साधून जातात. अगदी आपलीशी होतात. हवी हवीशी वाटतात. तिथे स्थलभेद, लिंगभेद, आवडी निवडी काही काही आडव येत नाही, सूत जमून जातं आणि गाठी पक्क्या बसतात. आयुष्यात काही मनसुबे असे पटकन जुळतात आणि आनंद देतात. ही नाती खासगी असतात, नाजूक असतात. जेवढ्या लवकर ती जुळतात तेवढया लवकर ती नासण्याचाही संभव असतो. मला वाटत अशा नात्यांनाच मैत्री हे नाव दिलं गेलं असावं. तसे परिचयाचे पन्नास असतात हो आयुष्यात पण मैत्री सार्थ करणारे मित्र कमी सापडतात बहुधा. मैत्री एक सोपी व्याख्या आहे..

'रोज आठवण यावी अस काही नाही, रोज भेट व्हावी अस काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं अस ही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री.'

अशी सोपी सरळ पण घट्ट मैत्री टिकवणं निर्माण करणं फार कठीण नाही आणि फार सोपही नाही.

मनाचा एवढा हळवेपणा नवरा - बायकोच्या नात्यामध्ये नाही हो येत. तिथे मित्रच असावा लागतो. कारण इतर कुठल्यही नात्याला आपण नाव देतो आणि नाव दिलं की त्या बरोबर मानसिक, शारिरीक, कौटुंबीक आणि सामाजीक बंधन पण येतात. ह्या नात्याला मात्र नाव नाही आणि त्यामुळे कसली बंधनही नाहीत. आणि किंबहूना ती तशी नसावीतही. वाट्टेल त्या विषयावर आपण गप्पा मारू शकतो मोकळे होउ शकतो. तिथे स्त्री - पुरूष, जात - पात काही नाही आडवे येत. मनसूबा बनून जातो आणि मन आनंदी होतं.

शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जाणलं अस मी समजतो. अशा सगळ्या मित्रांना माझ्या शुभेच्छा. ही नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या. आनंद आनंद म्हणजे काय हो, अहो अशी नाती जोडणं असे मनसुबे जुळवणं हाच आनंद.
लक्षात ठेवा तोडणं सोप आहे पण जुळवणं आणि टिकवणं कठीण.
- पु. ल


0 comments: