Friday, April 29, 2022

post 2

गुलजार यांची मुलाखत..

सुमारे ४५ वर्षांपूर्वी डॉ. राम पंडित यांनी गुलजार यांची घेतलेली ही मुलाखत, मित्र ज्ञानेश्वर आगाशे, विजय हरी वाडेकर यांच्या 'राजस' या मासिकात प्रकाशित झाली होती. आजही त्यातील मजकूर, गुलजार यांचे लिखाण, विचारधारा व व्यक्तिमत्त्व जाणण्यासाठी सहाय्यक ठरेल.

ह्या मुलाखतीत डॉ. राम पंडित यांनी गुलजार यांना विचारलेले प्रश्न आणि गुलजार यांनी मांडलेली स्पष्टीकरणे ह्यातील दूरदृष्टीला सलाम केला पाहिजे..

--------------------------------------------------
गुलजार यांची मुलाखत : भाग १
--------------------------------------------------

सोना,
काही श्वास तुझ्या पूर्वी जगलो
काही श्वास तुझ्यासवे जगत आहे
असं होत नाही का गं सोना,
की साऱ्या जीवनात
एक श्वास मिळतो जगण्यासाठी
अन् कधीकधी एका श्वासात
कोणी सारे जीवन जगतो
ह्या कवितांमधे मी
आपले श्वास एकत्र केले आहेत

सोना,
जे तुझ्या झोळीत टाकीत आहे
काही श्वास जे मी जगून घेतले
काही श्वास जे मी जगू शकलो नाही
आणखी काही अर्धेअपूर्ण श्वास, 
ज्यात तू
आपले श्वास जोडून देशील तर शप्पथ
एका श्वासात सारे जीवन जगून घेईन
--------------------------------------------------

होय ही कविता आहे; पण ही अर्पणपत्रिका आहे. ही आहे गुलजारची कविता. होय हा आहे कवितेतील सुगंधाला देहरूप देणारा गुलजार. चित्रपटातील संवाद, दिग्दर्शन ह्यापलीकडेही एक गुलजार उभा आहे. तो आहे कवी गुलजार. 

जीवनातील कडू-गोड अनुभव, प्रत्येक क्षणाच्या पडद्यात दडलेल्या जाणिवांचा शोध घेत अनंत श्वासांच्या प्रवासाला निघालेला हा यात्रिक स्वतःच्या कवितांबद्दल, उर्द साहित्याबद्दल काय म्हणतो, हे जाणून घेण्यासाठी मी ही त्याची घेतलेली मुलाखत. अनिवार मोह होत असतानाही मी त्याला त्याच्या वैयक्तिक व चित्रपट जीवनाबद्दल काहीही विचारले नाही; पण त्याबद्दल खंत नाही; पण तरीही वाटतं खूपच विचारायचं राहूनच गेलंय. 

हा संवाद गुलजारच्या साहित्यजीवनावर खूप प्रकाश पाडेल, यात शंका नाही. ‘राजस’चा वाचकवर्ग ह्या मुलाखतीचे सहृदयतेने स्वागत करेल अशी आशा नाही तर मला पूर्ण खात्री आहे. 
--------------------------------------------------

त्या वेळी 'राजस'च्या वाचकांनी ह्या मुलाखतीचे स्वागत केले होतेच.. आज फेसबुकवरील वाचक मंडळीही ह्या मुलाखतीचे तितक्याच आत्मियतेने स्वागत करतील...
--------------------------------------------------

राम : आपण कविता लिहिण्यास केव्हा व कुठे सुरुवात केली?

गुलजार : हे फॅसिनेशन जे असत ते शाळेच्या वेळी लागलं. “विंटल कॉलस् ए पोएट” असं म्हणतात. शायरीचा शौक त्या कच्या वयातच लागला. शहर दिल्ली.. शाळेचे दिवस अन् भाषा उर्दू.. कारण शिक्षणाचे माध्यम उर्दूच होते, त्यामुळे प्रारंभ तेथूनच झाला. (माईक पाहिजे?)

राम : नको, मी नंतर प्रश्न लिहून घेईन. 

राम : तुम्ही कधी मुशायऱ्यात भाग घेतला आहे काय? कारण माझ्या तरी पाहण्यात आले नाही. 

गुलजार : दिल्लीत शाळा व कॉलेजमधे असताना मुशायऱ्यात भाग घेतला. नंतर मुंबईला आलो व येथेही कॉलेज जॉईन केले. इथेही पी. डब्लू. ए. मीन्स प्रोग्रेसिव्ह रायटर असोसिएशन हीयर यु नो. त्यावेळी बन्नेखाँ सज्जाद जहीर आदिबरोबर मुशायर्‍यात हजेरी लावीत असे; पण हे मुशायर्‍यात जाणे हळूहळू कुठंतरी सुटत गेलं.. अन् मग असं सुटलं की बस्स.. 

राम : पण मजरूह, साहिर आदि अजूनही भाग घेतात. 

गुलजार : होय, ते घेतात भाग.. पण, माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर थोडीबहूत पुढे पुढे मला भीतीच बसली. आता माईकच्या समोर जाण्याचं धैर्यही राहिलं नाही, असं म्हणाल तर हरकत नाही. 

राम : मी तुम्हाला काय म्हणू? गीतकार की कवी? कारण आजचे समीक्षक तरी हे दोन भेद पद्य साहित्यात मानतात. त्यामुळेच मराठीत माडगुळकर आणि हिंदीत नीरजला कवी म्हणावयास ते तयार नाहीत. 

गुलजार : हे मी गीत लिहिण्यास फार उशिरा सुरुवात केली. तुम्ही तर माझे 'जानम' आणि 'एक बंद चांद' हे कवितासंग्रह वाचलेच आहेत. त्यात तुम्हाला दिसलंच असेल की मी मूलतः कविताच लिहितो. गीत लिहिण्याची मला संधी चित्रपटात आली तरीही मी प्रथमतः ती स्वीकारली नाही; आणि आताही लिहितो तेही अगदी ठराविकच. करीअर म्हणून त्याचा स्वीकार केला नाही. 

राम : तुमच्या कवितेबाबत आमच्या उर्दूस्नेही व समीक्षक मित्रांचा आरोप आहे की, ती ती मीराजी एवढी नाही; पण अख्तर उल इमान एवढी अस्पष्ट भाषा आहे. ह्याविषयी तुम्हांला काय सांगायचं आहे?

गुलजार : होय, इमेजेसच्यामुळे; भाषेमुळे नाही; कारण इमेजेस थोड्या कठीण आहेत. त्या सर्वपरिचित नाहीत. माझ्या कविता वाचल्यानंतर जर तसे वाटत असेल तर ते मी कबूल करतो. जर तो गुन्हा आहे तर मला तो मान्य आहे, पण आता जेव्हा मी माझ्या जुन्या कविता वाचतो तेव्हा मला जाणवतं की पूर्वी मी जी उभाषा वापरत होता ती फार मिलष्ट होती व इमेजेस सोप्या होत्या. आता हळहळ भाषा सोपी होऊ लागली व व्यस्त प्रमाणात इमेजेस मात्र कठीण होत चालल्या आहेत परिवर्तन मी स्वत: अनुभवतो. 
--------------------------------------------------

क्रमशः

0 comments: