Saturday, July 23, 2022

post 3

*बखर_सावरकरांची:* भाग ४० (०९/०७/२०२२)

*१९. मित्रमेळ्याचा विस्तार.*

 हळूहळू मित्रमेळ्याचा विस्तार होऊ लागला. तात्यारावांच्या संपर्कात येणारा बहुतेक मित्रमेळात सामील व्हायचा. तात्यारावांची मैत्री म्हंटले की, तिचा मुख्य कटाक्ष हाच असे. आपले विचार आपल्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीस सांगावेत. आपले म्हणणे सर्वांना पटवून द्यावे. हा तात्यारावांच्या मैत्रीचा अविभाज्य घटक असे. तात्यारावांना देशभक्ती आणि सशस्त्र क्रांती हे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे सगळ्यात जास्त महत्वाचे वाटे. चकाट्या पिटत बसण्यात त्यांना अजिबात रस नसे. त्यांच्या अभ्यासात, खेळण्यात, बोलण्यात, हसण्यात एकच विचार असे. तो म्हणजे, स्वदेश स्वातंत्र्य. कोणीही त्यांचा एकदा मित्र झाला की, त्यात अमुलाग्रह बदल होत असत. ती व्यक्ती आग्रहाने स्वदेशी वस्तू वापरू लागे. त्या व्यक्तीत स्वदेशाभिमान जागा होई. त्यास स्वदेशाच्या स्वातंत्र्याची तळमळ लागे. पुढे त्यांच्या विचारात देखील देशा शिवाय बाकी काही उरत नसे. यावेळी त्यांचे अनेक जण मित्र होत असत, त्यात जयवंत बंधू आणि शंकर वाघ देखील होते.

 मित्रमेळ्याच्या सभासदांना त्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे विषय दिले जात. त्या विषयात त्या सभासदाने पूर्ण अभ्यास करून त्या विषयाची तयारी करायची. त्यासाठी लागले तर ग्रंथ वाचावेत. त्यावरून निबंध लिहून काढावा, तो इतर सर्व सभासदांसमोर वाचून दाखवावा किंवा त्यावर भाषण द्यावे. शनिवार, रविवारच्या बैठकीत अशी भाषणे ठेवली जात. त्यामुळे सर्वच सभासदांना अनेक विषयातील माहिती होई. विविध विषय त्यांचे तयार होत. आपले विचार मांडण्यासाठी आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना पुरेस साधन मिळत असे. ज्या सभासदांना अभ्यास करून विषय मांडण्याची जबाबदारी दिलेली असे, ते देखील मनापासून आपले काम करत असत.

 प्रत्येक बैठकीस तात्याराव उपस्थित असतच. पण अनेक सभासदांना या साप्ताहिक बैठकीत फारसा रस नसे. बैठकीत चालणाऱ्या चर्चेत उत्साह वाटत नसे. अशा सभासदांना सार्वजनिक मिरवणुका किंवा एखाद्या उत्सवात जास्त रस असे. त्यामुळे अशी काही मंडळी फक्त कार्यक्रमापुरती जमत. किंवा बैठकीस कोणी मोठा माणूस बोलावलं की तेवढ्या पुरती ही मंडळी येत. त्यांना प्रत्येक सप्ताहात तेच ते चिंतन, मनन नको असे. (१)
© आदित्य रुईकर

0 comments: