Tuesday, October 7, 2025

post 2

तुझी तू रहा

कुणी नसलं तरी चालेल
तुझी तू रहा
फक्त तुझ्याच डोळ्यांनी
तुझे जग पहा. .

हास जेव्हा ओठ हसतील
रड जेव्हा डोळे रडतील
हसण्यावर,अश्रूंवर
तुझी सत्ता ठेवून रहा
कुणी नसलं तरी चालेल
तुझी तू रहा...

मुसळधार सरी येतील
तुझा अंगार विझवू बघतील
विझणा-या ठिणगीवर
फुंकर घालीत रहा
कुणी नसलं तरी चालेल
तुझी तू रहा........

काटे जरी बोटी रुततील
फुफाट्यात पावले जळतील
फक्त तुला आवडणारीच
फुले वेचीत रहा
कुणी नसलं तरी चालेल
तुझी तू रहा....

उसने मुकुट कुणी
घालतील
जरी-अंगरखे पेहेरून
सजतील
तुझ्या सुती वस्त्राचा
अभिमान तू वहा
कुणी नसलं तरी चालेल
तुझी तू रहा....

मग कुठेतरी कमळे
फुलतील
सुगंध घेऊन वारे येतील
तुझ्या मोकळ्या गळ्यातले गीत
तोवर तू गात रहा
कुणी नसलं तरी चालेल
तुझी तू रहा
फक्त तुझ्याच डोळ्यांनी
तुझे जग पहा....

- संजीवनी बोकील

post 1

व.पु.काळे.
निखळ मैत्रीतली एक विलक्षण ताकद जर कोणती असेल तर त्यातली सहजता.. त्या सहजतेमधुन सुरक्षीतपणाची साय आपोआप धरते.. साय दुधातुन तयार होते आणि दुधावर छत धरते.. साय म्हणजे गुलामी नव्हे.. सायीखालच्या दुधाला सायीचं दडपण वाटत नाही.. मैत्री तशी असावी.. दुधापेक्षा स्निग्ध.. सायीची नंतरची सगळी स्थित्यंतर-म्हणजे दही, ताक, लोणी, तूप- ही जास्त पौष्टिक असतात..तसं मैत्रीचं घडावं.. मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तीमत्वाचा नवा उत्कर्षबिंदु ठरावा....