कुणी नसलं तरी चालेल
तुझी तू रहा
फक्त तुझ्याच डोळ्यांनी
तुझे जग पहा. .
हास जेव्हा ओठ हसतील
रड जेव्हा डोळे रडतील
हसण्यावर,अश्रूंवर
तुझी सत्ता ठेवून रहा
कुणी नसलं तरी चालेल
तुझी तू रहा...
मुसळधार सरी येतील
तुझा अंगार विझवू बघतील
विझणा-या ठिणगीवर
फुंकर घालीत रहा
कुणी नसलं तरी चालेल
तुझी तू रहा........
काटे जरी बोटी रुततील
फुफाट्यात पावले जळतील
फक्त तुला आवडणारीच
फुले वेचीत रहा
कुणी नसलं तरी चालेल
तुझी तू रहा....
उसने मुकुट कुणी
घालतील
जरी-अंगरखे पेहेरून
सजतील
तुझ्या सुती वस्त्राचा
अभिमान तू वहा
कुणी नसलं तरी चालेल
तुझी तू रहा....
मग कुठेतरी कमळे
फुलतील
सुगंध घेऊन वारे येतील
तुझ्या मोकळ्या गळ्यातले गीत
तोवर तू गात रहा
कुणी नसलं तरी चालेल
तुझी तू रहा
फक्त तुझ्याच डोळ्यांनी
तुझे जग पहा....
- संजीवनी बोकील
0 comments:
Post a Comment