Monday, July 26, 2010

आषाढी एकादशी




आषाढी एकादशी

हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो व वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या प्रेमनगरी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो.

पौराणिक काळी मृदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराची आराधना करून ''तुला कोणाकडूनही मृत्यू येणार नाही. फक्त एका स्त्रीच्या हातून मृत्यू येईल'' असा वर मिळतो. त्यामुळे उन्मत होऊन मृदुमान्य राक्षस देवांवर स्वारी करतो व त्याचा पराभव करतो. सर्व देव पराभूत होऊन एका गुहेत लपतात. त्याच वेळी एकादशी देवतेचा जन्म होतो व ती मृदुमान्य राक्षसाचा नाश करून देवांची मुक्तता करते. त्यावेळी पाऊस पडत असल्यामुळे सर्व देवांचे स्नान होते व गुहेत असल्यामुळे उपवासही घडतो. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत उपवास म्हणून करण्याचा प्रघात पडला.
परस्परावर प्रेम करणे, प्राणीमात्र, अपंगावर प्रेम करणे, गरजवंताला मदत करणे ही शिकवण हा दिवस आपल्याला देतो. हा एक अत्यंत पवित्र दिवस आहे.

सर्वेपि सुखिन: सन्तु ।
सर्वे सन्तु निरामया ।
सर्वे म्रदाणि पश्यन्तु ।
मा कश्चिद दु:खमाप्नुयात ।


0 comments: