Thursday, February 7, 2013

आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यात ऑडिओ बुक्सची चलती

आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यात ऑडिओ बुक्सची चलती
सौजन्य :महाराष्ट्र टाइम्स 

पुस्तके आता वाचतच बसायला हवी , अशी आवश्यकता नाही . बसल्या जागी फक्त ते ऐकायला वेळ काढा . श्राव्य ( ऑडिओ ) पुस्तकांमुळे ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली आहे .

दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यात यंदा लक्षावधी छापील व ई - पुस्तकांच्या गर्दीत , सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र ठरला आहे हॉल क्रमांक एक मधला ' रिडो डॉट कॉम ' चा स्टॉल . जिथे पाच हजारांहून अधिक पुस्तके ऑडिओ स्वरुपात उपलब्ध आहेत .

पाश्चात्य देशात ऑडिओ बुक्स ही संकल्पना वेगाने लोकप्रिय होते आहे . भारतात मात्र हा प्रयोग नवा आहे . ' रिडो डॉट कॉम ' च्या स्टॉलवर सर्वाधिक लोकप्रिय पुस्तक ठरले आहे चाणक्य नीती . याखेरीज खुशवंतसिंग यांचे ' द कंपनी ऑफ विमेन ', ' डोंगरी टू दुबई ', ' द हॅबिट ऑफ विनिंग ', ' द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा ', ' द सेव्हन हॅबिट्स ' आदी ऑडिओ पुस्तकेही लोकांच्या पसंतीला उतरली आहेत . लवकरच अधिकाधिक भारतीय पुस्तके ऑडिओ फॉर्ममध्ये उपलब्ध होतील , असे कंपनीचे सीईओ सुमित सुनेजा म्हणाले .

अनेक जण हौसेने पुस्तके खरेदी करतात . मात्र वाचायला वेळ नाही , अशी खंत व्यक्त करताना दिसतात . अशा लोकांसाठी ऑडिओ बुक्स ही संकल्पना अत्यंत प्रभावी ठरणार आहे . इतके दिवस अनेकांना आपण मोबाइलवर गाणी अथवा संगीत ऐकताना पहायचो . आता मोबाइल अथवा टॅबलेटवर पूर्ण पुस्तक लोड करणे अवघड नाही . बस , लोकल अथवा मेट्रोच्या प्रवासात , कानाला छानसा हेडफोन अथवा छोटे स्पीकर्स लावून आता अख्खे पुस्तक ऐकता येईल .

मराठी मेळा
दिल्लीच्या प्रगती मैदानावर येत्या १० फेब्रुवारीपर्यंत आयोजित आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळयात इमारत क्रमांक १४ मध्ये दालन क्रमांक ८७ व ८८ मराठी पुस्तके व ग्रंथांनी सज्ज आहेत . नामवंत लेखकांची गाजलेली अधिकाधिक मराठी पुस्तके या मेळ्यात वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी मराठी प्रकाशक परिषद व अ . भा . मराठी प्रकाशक संघ या दोन संस्था विशेष प्रयत्न करीत असतात . दिल्लीकरांनी ताज्या मराठी पुस्तकांचा , ग्रंथांचा व प्रकाशनांचा लाभ घ्यावा , असे आवाहन या संस्थांचे पदाधिकारी रमेश कुंटूर , अरविंद पाटकर , व अरुण जाखडे यांनी केले आहे .

0 comments: