Wednesday, January 6, 2016

आज तेंडुलकर बाबांचा वाढदिवस.......

आज तेंडुलकर बाबांचा वाढदिवस


खरा तो सात तारखेला साजरा होतो पण एकदा तेंडुलकर आईने सांगितल्याचं आठवतय की बाबांचा खरा ज्न्मदिवस सहाच आहे.. शाळेत सात तारीख लागली
बाबा गेले तेंव्हा मी तरुणभारत या दैनिकासाठी त्यांच्या स्मरणार्थ हा लेख लिहिला होता..
प्रिया तेंडुलकरची ’रजनी’ ही दूरदर्शन मालिका अैन प्रसिद्धीच्या शिखरावर असताना प्रिया तेंडुलकरने डी. डी. -१ साठी स्वयंसिद्धा या दूरदर्शन मालिकेची निर्मिती करायला घेतली आणि मॉडेल को-आर्डीनेटर म्हणून तेंडुलकरांच्या प्रशस्त आणि मोकळ्या घरात मी प्रवेश केला.
पण योग असा की माझ्याकडचा अेकही कलाकार प्रिया दिदीच्या कुठल्याच मालिकेत कधीही चमकला नाही तरी मला तेंडुलकरांच्या घरात ’चंद्रशेखर गोखले’ म्हणून आश्रय मिळाला.
विजय तेंडुलकरांची माझी ओळख झाली ते प्रियादिदीचे बाबा म्हणूनच. त्यामुळे लेखक, नाटककार, पत्रकार, पटकथाकार या सगळ्या बाबांच्या ओळखी माझ्या दृष्टीने कायम दुय्यम स्थानावरच राहिल्या. ते बाबा आणि मी शेखर आमचं हे नातं माझ्या दृष्टीने खरं आणि माझ्यापुरतं पुरेसं राहिलं.
मी तेंडुलकरांच्या घरात प्रवेश मिळवला तेंव्हा माझ्या आधी कितीतरी निराधार जीव या घरात आश्रय मिळवून होते. पंख तुटलेली घार, जायबंदी झालेली कोकीळा, घरटं मोडलेल्या चिमण्या, दृष्टी गेलेले कासव असे जीव या घराने सामावून घेतले होते. मी हाती पायी धड होतो पण घरातून बाहेर पडलेला होतो. माअीकडे राहत होतो म्हणून निराधार नव्हतो अेवढच.
माझं तेंडुकलरांच्या घरी स्थान पक्क झालं ते आअीमुळे. सीमा, सुषमा, प्रिया, राजू अितकाच मोकळा संवाद आअीने माझ्याशी ठेवला त्यामुळे त्या घरात माझं रेंगाळणं सुरू झालं.
बाबांची तेव्हा मला जाणवलेली खासियत अशी की बाबा कायम निटनेटके आणि प्रसन्न असायचे.
तमाम तेंडुलकर परिवार गाडीघोड्याशिवाय फिरत नसताना बाबा मात्र सपासप रस्ता काटत स्टेशन गाठायचे आणि अगदी सहज रेल्वेच्या सेकंड क्लासच्या गर्दीत शिरायचे. त्यांचं ते चालण मला आता जरा जास्तच ठळक आठवतंय.
तसं बाबांची एक गोष्ट मला खूप आवडायची म्हणजे घरी परत आल्या आल्या ते आअीला शोधत(शोधावं लागण्या इतकं मोठं घर बाबांच होतं) आअीसमोर जायचे. अगदी तिच्याशी बोलतील असे नाही पण तिला बघायचे, तिचं लक्ष गेलं तर हसायचे आणि आपल्या खोलीकडे वळायचे. तेव्हा त्यांच्याकडे टायसन नावाचा निरागस आल्सेशियन कुत्रा होता. त्याला थोपटल्याशिवाय आणि त्याच्या पाणी प्यायच्या भांड्यात पाणी आहे की नाही हे पाहिल्याशिवाय ते खोलीत जात नसत.
मी थोडफार लिहितो हे त्यांनी माझ्या बोलण्यावरून ओळखलं होतं. "काय काय वाचतोस?" बाबांनी विचारलं. मी वाचत नाही हे शब्दात सांगायच्या अैवजी ’नाही’ अशी मी मान हलवली. त्यावर "जे मनाला रुचेल ते वाचत जा", असे ते म्हणाले.
आणि खरंच बाबांच्या खोलीत असंख्य विषयांवरची असंख्य पुस्तकं निटस पद्धतीने मांडलेली असायची. बाबांची खोली पर्यायाने छोटी पण मोठी सुबक होती. मला बाबांच्या खोलीत बसायला आवडायचं आणि त्याच बरोबर दडपण ही यायचं.
अठरा पगडची माणसं बाबांना भेटायला येत आणि सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे अवधान राखून तिथे हजर असणाऱ्या प्रत्येकाची ओळख बाबा आवर्जून करून द्यायचे. ओम पुरी, गोविंद निहलानी, गिरिश कर्नाड, श्याम बेनेगल अश्या कितीतरी मान्यवर लोकांची ओळख त्याच घरात झाली.
मान्यवरांवरून एक आठवलं, अशीच एक चित्रपट क्षेत्रातील मान्यवर हस्ती अेकदा बाबांकडे आली होती. मेन डोर मधून बाबांच्या खोलीत जायचं तर हॉल पासनं जरा प्रवास करत जावं लागायचं. स्वैपाकघर, मग पॅसेज, मग राजूची खोली, मग उजवीकडे गेल्यावर बाबांची खोली असा प्रवास असायचा. तर हे महाशय बाबांच्या मागून अगदी अदबीने चालले होते तेवढ्यात टायसन मधे आला. टायसन जातीने आल्सेशियन होता. देहाने गब्दूल होता. पण त्याच्या उरात सशाचं काळीज होतं… एकदम दहा माणसं घरात शिरली तर आमचा टायसन कॉटखाली जाऊन बसायचा आणि एखाद दुसरा पाहुणा असेल तर हा बहादुर मागे दौडायचा(बहादूर हा बाबांकडचा इमानी नोकर) हा इसम आला तेव्हा टायसन पॅसेज मधे होता आणि बहादुर कडे धावायच्या नादात तो या पाहुण्यांच्या पायात आला… तुच्छतेने त्या पाहुण्याने आमच्या टायसनला लाथेने दूर लोटलं… माझ्या लक्षात आलं तसच ते बाबांच्याही लक्षात आलं. त्या क्षणी बाबांची बनलेली तीक्ष्ण नजर… मीच काय तो पाहुणाही विसरला नसेल.
पाहुण्यांवरून आणखी एक किस्सा आठवला. एकदा फ्रांस वरून बाबांची मुलाखत घ्यायला काही पत्रकार आले होते. तेव्हा हॉलमधे एक नक्षीदार पार्टीशन होतं… पार्टीशनच्या अलीकडे मी जेवायला बसलो होतो. पलिकडे बाबा त्या पत्रकारांशी बोलत होते.
बहादुर मला जेवायला वाढत होता मुळात मी उशीरा आलो होतो आई दुपारची पडली होती मी बहादुर कडे पोळी मागितली. त्याला दोन हात आणि दहा कामं त्यामुळे पोळी मागूनही दोन चार मिनिटं झाली तरी बहादुर येईना…
आणि पत्रकारांशी बोलणारे बाबा अनपेक्षितपणे अुठले, आत गेले आणि माझ्या ताटात पोळी वाढून पुन्हा बाहेर जाऊन त्या पत्रकारांच्या संभाषणात सहज सहभागी झाले. मी अवाक होऊन पहातच राहिलो. आपण काही केल्याचा आविर्भाव नाही. कसला आव नाही. मला सुद्धा या घटनेतलं वर्म कालांतराने अधिक तीव्रतेने जाणवलं.
तसे अेकदा त्यांच्या नातवाने कुठून तरी रातराणीची फांदी कुंडीत आणून खोवली. नशिबाने ती तगली तर त्याचंही बाबांना किती कौतुक. त्यांचे जवळचे कोणी स्नेही आले की ते त्यांना आवर्जून ती फांदी दाखवत. आदित्य मनोमन खूश होऊन जायचा… पाहुणे फांदी बघत असताना बाबा आदित्यचा मोहरलेला चेहरा बघत रहायचे. त्यांचा तो आनंद होता. त्यांनी आपल्या मुलांना "सध्या काय चाललंय?" असा सरधोपट प्रश्न कधीच विचारला नाही पण त्यांना जाणून घ्यायला आवडायचं.
मी तेंडुलकरांकडे प्रवेश मिळवला त्या आधिच, तनुजाचं लग्न झालं होतं. ती तिच्याघरी छान रमलेली होती. त्यामुळे तिचं जाणं येणं कमी असायचं. सुषमाने काम करण जवळ जवळ थांबवलं होतं. तर प्रिया मराठी, गुजराथी आणि हिंदी चित्रपटात बिझी होती.
तू सुषमाला पुन्हा काम करायला तयार कर. एकदा रात्री ते मला म्हणाले. त्या वाक्यातला स्वर त्यातील आर्तता अेवढी विलक्षण होती. राजू सुद्धा काहीबाही लिहायचा पण बाबांना दाखवायचा नाही. आणि विरोधाभास असा की जगभर चे तरूण कथा, पटकथा घेऊन बाबांचं मत घ्यायला त्यांच्या समोर येऊन बसायचे.
तासंतास त्यांच्याशी चर्चा करायचे...
बाहेरगावाहून आलेली मंडळी जेवल्याशिवाय तेंडुलकरांच्या घरातून जायची नाहीत. आअी स्वयंपाक छान करायचीच पण राजूच्या बायकोच्या हातालाही छान चव होती. जेवायला खायला घालायाला तेंडुलकर परिवार सदैव तत्पर असायचा. अेकदा पायनॅपलचं आअिस्क्रीम कोणीतरी पाठवलं होतं…. तर आअी म्हणाली खातांना बाबांनी दोनदा सांगितलं थोडं शेखरला ठेव त्याला आअिस्क्रीम खूप आवडतं.
स्वतः बाबांना खाण्या पिण्याच्या बाबतीत अेवढा अिंटरेस्ट नसायचा. जरा अगोड असा चहा आणि हलकसं बटर लावलेले ब्रेडचे दोन स्लाअिस असा नाष्टा घेताना मी त्यांना बरेचदा बघितलंय.
शहाळ्याचं पाणी आवडीने प्यायचे,गोड कधी विशेष खाताना बघितलं नाही पण देशाविदेशात फिरलेले असल्याकारणाने अनेक विविध पदार्थांच्या चवी बाबांनी चाखल्या होत्या.्तसच फोर्ट मधले इराणी पदार्थ त्याना आठवायचे
मार्निंग वॉक बाबत सुद्धा ते तसेच आग्रही होते. स्वतःचं रूटीन ते स्वतःच सांभाळायचे. त्यामुळे कुणाला त्यांचा त्रास व्हायचा नाही. पहाटे साडेपाच पावणेसहाला ते सरळ बाहेर पडायचे आणि सपासप चालून घरी यायचे. म्हणजे अगदी राजू अकाली गेला तरी त्यांच्या या नियमात फरक पडला नाही. मला वाटतं दुसऱ्या दिवशीच ते सकाळी मॉर्नींग वॉकला जाताना लोकांना दिसले. याचा अर्थ ते मनाने कोरडे होते असा नाही पण विशिष्ट अवस्थेत स्वतःपासून अलिप्त होण्याची किमया त्यांना साध्य होती.
मधे सांगलीला पुरस्कार घेण्यासाठी त्यांना जायचं होतं. हो नाही हो नाही करताना शेवटी बाबा गेलेच नाही. त्यावरून बराच अुहापोह झाला. पण बाबा तेंव्हाही अलिप्तच होते… शांत… स्तब्धं.
मी थोडेफार लिहितो याची त्यांना कल्पना होती पण प्रियादिदीच्या हाती माझी चार ओळींची बंद वही लागली आणि जणु सारं जग माझ्यासाठी खुलं झालं… बाबा तेंव्हा मला कौतुकाने शेखरशंभू म्हणाल्याचं आठवतंय. १८ अेप्रिल १९९० ला ’मी माझा’चं औपचारिक प्रकाशन झालं त्यावेळी प्रियादिदी माझ्याशी बोलत नव्हती, ती मला शिरिष पैं कडे नेणार होती. प्रकाशनासाठी तिला बोलावणार होतो. पण शेवटी ते जाणं राहिलंच तेंव्हा मी घराबाहेर राहत होतो. माझ्या तिघी बहिणी सोडल्या तर या पुस्तकाबद्दल ना कुणाला खात्री होती ना अुत्साह. अशावेळी प्रकाशनासाठी कुणाला बोलवायचं?… सुषमा म्हणाली मी बाबांना आणते आणि खरंच अगदी सहज बाबा आले त्या आधी माझ्या पुस्तकाला प्रस्तावना हवी असं समजून सुषमा ने बाबाना गळ घातली बाबा तयारही झाले पण मला कोणाचीच प्रस्तावना नको होती मी घाई घाईने म्हणालो नको नको प्रस्तावना नको त्यावेळी बाबानी कलती केलेली मान आणि ओंचावलेल्या भुवया मी अजूनही विसरलेलो नाही तरीही बाबा आले आणि ’मी माझा’चं प्रकाशन करून गेले. कुठे आढेवेढे नाहीत की… तेंव्हा ते सहज बोलल्यासारखे आअीला म्हणाले… शेखरला घराबाहेर का ठेवलंय? आअी म्हणाली त्याचा तोच गेला. बाबा म्हणाले… "शेखर आअीसाठी घरी जा!", अेवढ्या व्यक्तिगत बाबतीत लक्ष घालताना मी बाबांना प्रथमच बघत होतो. मी त्यांचं अैकलं आणि घरी गेलो. घरी काही मनापासून स्वागत झालं नाही पण आता मी बाबांच्या शेजारीच रहायला आलो.
मी लग्न जमवलं तेव्हा बरेच दिवसासाठी बाबा यूरोप दौऱ्यावर जायचे होते. त्या गडबडीत बाबांनी मला अुमाला घेअुन यायला सांगितलं. मला बाहेर बसवुन तासभर ते तिच्याशी काय बोलले हे अजून मला कळलेलं नाही. पण ज्या अर्थी चौदावर्ष आमचा सुखाचा संसार सुरु आहे त्याअर्थी काहीतरी कानमंत्रच दिला असणार हे नक्की.
आमच्या लग्नालाही बाबा आवर्जून आले. आम्ही दोघे पाया पडल्यावर आम्हाला आशिर्वादही भरभरून दिला. नाहीतर अेरवी पाया पडलेलं मनापासून त्यांना आवडत नसे.
राजू गेला आणि बाबांचं घर रिकामं झालं. पिंजरे रिकामे झाले, फिशटँक्स रिकाम्या झाल्या, कासवं नाहीशी झाली. प्रिया दिदी आणि आअी दोघींचं आजारपण सुरू झालं. मग आअी जाणार असे वाटत असताना प्रियादिदीच गेली…
त्यानंतर बाबांना भेटायचं धाडस माझ्यात नव्हतं.. पण तरी संध्याकाळी मी आअीला भेटायला म्हणून गेलो. सांजवेळ झाली होती… घर अंधारलं तरी दिवे लावले नव्हते… बहादुर ने दार उघडलं आणि त्याच्या लक्षात आल्यावर त्याने दिवे लावले… पहिल्यांदा बाबांच्या घरातला प्रकाश मला मलूल वाटला… फरशीवरचं जाजम गुंडाळून ठेवलं होतं… आअी अडखळते… बदाहुरने खुलासा केला आणि आता टायसन ही नाही तो निर्विकार पणे म्हणाला म्हणजे?… मी विचारलं.
बाबा म्हणायचे… नुसत्या फरशीवर चालून कुत्र्यांना संधिवात होतो म्हणून हर जगह कारपेट डाला था…
टायसन गेला? अुमाने विचारलं. हो म्हणत त्याने उत्तर द्यायचं टाळलं… आअीचा या संभाषणाशी, त्यातल्या तपशीलाशी काही संबंध नव्हता… तिच्या दृष्टीने प्रिया पन्हाळ्याला शुटींग करत होती. राजू ग्यान सहाय च्या शुटींग मधे बिझी होता आणि आमच्या दोघांचं अजून लग्न व्हायचं होतं… तिचं म्हणणं खरं मानून हे संदर्भ लक्षात घेत तिच्याशी बोलणं खूप जड जात होतं. प्रियाचं लांड्रीवाल्याशी भांडण झालं, राजू पहाटे घरी येअून परत दुपारी गेला. त्याच्यासाठी रावसाचं तेलतीखं केलं पण जेवलाच नाही… बापरे! जगातून नाहीशी झालेली माणसं अजून तिच्या परिघात होती… खरंच आपलं अस्तित्व दुसऱ्याच्या मानण्यावर असतं. मी घर सोडताना माझे वडील मला म्हणाले होते… तू आमच्यासाठी मेलास. या वाक्यातील दाहकता तेव्हा मला कळली.
बहादुर ने चहा समोर आणून ठेवला म्हणून जाताही येअीना आणि तेवढ्यात बाबा आले थोडे थकल्यासारखे वाटले. पण बाकी काही त्यांच्यात विशेष बदल नव्हता… त्यांच्याकडून कळलं सुषमा पुण्याला असते. सीमा दुसरीकडे राहते आणी बंटी आणखीन तिसरीकडे. बाबा नेहमी प्रमाणे खोलीत गेले नाहीत ते तिथेच बसले. आअीच्या सगळ्या (निरर्थक) प्रश्नांना प्रमाणिक उत्तर देत होते.
तेव्हाच मला कळलं बाबांनी बद्रीधाम मधलं प्रशस्त घर आता विकायला काढलं होतं… मला अेकदा बाबांची ती छोटीशी खोली डोळेभरून पहावीशी वाटली. मी अभावितपणे तिथे जायला लागलो. बहादुर घाअिने म्हणाला अुधर कुछ नही है.
मी बाबांकडे बघीतलं, आम्ही बाहेर पडलो. तेव्हा त्यांच्या पाया पडायला हवं होतं असं आता वाटतंय. कारण नंतर अशी भेट झालीच नाही. मधे माटुंग्याला यशवंतराव नाट्यगृह पाशी भर पावसात ते बाल रंगभूमीच्या बाजुने आंदोलनासाठी अुभे होते तेव्हा मी त्यांना बघीतलं, भेटलो नाही.
त्या आधी आअी गेल्याचं कळल्यावर मी शेरे पंजाब च्या हिलटन टॉवर कडे धावलो होतो. पण त्या घराला कुलूप होतं.
मग प्रसिद्ध व्यक्तीच्या बातम्या कानावर येत राहतात तश्या येत राहील्या. कधी कुठल्या क्लिपींग मधे बाबा दिसत राहीले.
.. आणि आज आत्ता बाबा गेल्याचं कळल्यावर डोळ्यांना त्यांना बघायची तहान लागली. "मी माझा" या माझ्या पहिल्या काव्यसंग्रहावर बाबांची प्रस्तावना मी नको म्हटल्यावर बाबांनी खट्याळपणे अुंचावलेल्या भुवया आठवताहेत.
मी घरी राहायला आल्यावर मॉर्निंग वॉक वरून परतताना माझ्याघरी येअुन माझ्या वडिलांना शेखर कसा आहे? विचारणारे बाबा आठवताहेत. बाहेर पडायचं असताना आदित्य बरोबर तन्मयतेने टॉम अॅंड जेरी पाहणारे बाबा, फोटो काढण्यात रमलेले बाबा, वाचनात दंग झालेले बाबा, टायसन शी खेळणारे, आदित्यशी खेळणारे, कुणाशी म्हणजे अगदी कुणाशीही बोलायला सदैव तत्पर असणारे बाबा मला आठवतात आणि आठवत राहणार.
त्यांचं असं शांत निश्चल रूप मला पाहायचंच नव्हतं. आपलं अस्तित्व जर दुसऱ्याच्या मानण्यावर अवलंबून राहणार असेल तर माझ्या दृष्टीने तेंडुलकर बाबा अजून आहेत, मी असे पर्यंत बाबा राहणारच…
विजय तेंडुलकरांविषयी तर आता सारंच जग बोलेल, त्यांचं कर्तुत्वही तसंच आहे. पण आमच्या बाबांविषयी बोलायचं तर त्यानी आपलं झपाटलेपण लिलया पचवलं होतं म्हणूनच आमचे बाबा खरच ग्रेट होते, स्वतःच्या कथेचे हिरो होते........... आधी ते परीपूर्ण माणूस होते आणि मग बाकी सगळे काही होते. .....
~ चंद्रशेखर गोखले 

0 comments: