Sunday, April 2, 2017

ताण’लेल्या गोष्टी : तोलामोलाचा पार्टनर


शिकलेली मुलगी डोईजड होईल म्हणून आधीच नकार मिळतो.

डॉ. वैशाली देशमुख | Updated: March 31, 2017 3:03 AM

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा निर्णय – मुलांच्या आणि मुलींच्याही. तरी आजच्या लिबरल जमान्यातही मुलीच्या पालकांना तिच्या लग्नाची चिंता जरा जास्तच असते. लिबरल वातावरणात वाढलेल्या मुलींनाही त्यामुळे काही प्रश्न पडतात. जॉब, पगार, लुक्स, फॅमिली याच्यापुढे जातच नाही का आपण लग्न ठरवताना? आईवडिलांची चिंता रास्त की मुलींचे प्रश्न?

अनिशा लहानपणापासून ठाम विचारांची. वडिलांसारखं इंजिनीअर व्हायचं हे तिनं केव्हाच ठरवून टाकलं होतं. आईबाबांचा तिला नुसताच पाठिंबा नाही, तर प्रोत्साहन होतं. कॅम्पस इंटरव्ह्य़ूमधून लठ्ठ पगाराची नोकरी लागली, तेव्हा ती फक्त बावीस वर्षांची होती. बाबांच्या पगाराचा आकडा तिनं बघताबघता पार केला. तिचं काम ती मनापासून एंजॉय करत होती. ऑफिसनं तिला स्पेनला जायची ऑपर दिली होती. त्या दिवशी ती घरी आली तीच उडय़ा मारत! इतक्या ज्युनिअर मुलीला पहिल्यांदाच असा चान्स मिळत होता. त्यामुळे तिची कॉलर ताठ होती. कधी एकदा घरी जातेय आणि आईला सगळं हे सगळं सांगतेय असं तिला झालं होतं. पण सांगितल्यावर आईची रिअ‍ॅक्शन अनएक्सपेक्टेड होती. आनंद होण्याऐवजी ती वैतागलीच. अनिशाला कळेचना आईचं वागणं. ‘अगं आई, एवढी चांगली अपॉच्र्युनिटी मिळतेय मला आणि हे काय चाललंय तुझं?’ पण आईचा मूड काही सुधारला नाही. आईला कसंबसं पटवून ती फायनली स्पेनला गेली. एरवी मॉडर्न असलेली आपली आई मुलगी म्हटलं की, किती पारंपरिक होते, हे पाहून अनिशाला धक्काच बसला.

तीन वर्षांनी अनिशा तिचं काँट्रॅक्ट संपवून परतली. आता ती पंचवीस वर्षांची झाली होती. आईबाबांचं अर्थातच तिच्या मागे लग्नाचं टुमणं सुरू झालं. ती तिकडे असल्याच्या काळातही ते काही स्वस्थ बसले नव्हते. सतत स्थळं सुचवत होते. मुलांचे फोटो, काँटॅक्ट्स पाठवत होते. ती परत आल्यावर त्यांनी जरा जोर लावला. अनिशा मात्र डायलेमामध्ये होती. लग्न करायला तिची ना नव्हती. आत्तापर्यंत ती काही कुणाच्या प्रेमात वगैरे पडली नव्हती. त्यामुळे अरेंज्ड मॅरेज हाच पर्याय तिच्यासमोर आहे, याची तिला जाणीव होती. आईबाबांची अपरिहार्यता तिला समजत होती. पण त्याचबरोबर लग्नाळू मैत्रिणींचे किस्से ती ऐकत होती.

मधुरा – तिची मैत्रीण, लग्न ठरवणे या प्रोसेसमध्ये सध्या पिळून निघत होती. तिचे एकेक अनुभव ती अनिशाशी शेअर करायची. एक मुलगा बाकी चांगला होता, पण त्याची कंपनी आणि पगार दोन्ही तिच्यापेक्षा कमी होते. मधुराला चालणार होतं. पण बोलता बोलता तो म्हणाला, की लग्नानंतर नोकरी सोडायला तुझी हरकत नाही ना? दुसरा एक मुलगा नोकरी- पगाराच्या बाबतीत तिच्या बरोबरीचा निघाला. मग ते एकदा कॉफी प्यायला, म्हणजे खरं तर बोलायला गेले. ती परदेशी जाऊन आल्याचं कळल्यावर तो जरा अपसेट झाला. सरळ काही म्हणाला नाही, पण ‘तुम्ही काय बुवा.. फॉरेनची हवा चाखलेले. आम्ही आपले भारत सोडून कुठे गेलेलो नाही’, अशा तिरकस कमेंट्स त्यानं मारल्या. कितीही लिबरल आव आणला, तरी परदेशी जाणं हा मुद्दा नंतर त्रासदायक ठरू शकतो, हे तिच्या लक्षात आलं.

जान्हवी – त्यांच्या ग्रुपमधली तिसरी मैत्रीण. तिला मात्र लवकर करावं लागलं लग्न. या दोघींनी तिचं मन वळवायचा खूप प्रयत्न केला. पण ती म्हणाली, ‘माझा नाइलाज आहे गं! आमच्यात कुणीच जास्त शिकत नाही. सगळे घरच्या व्यवसायात पडतात. शिकलेली मुलगी डोईजड होईल म्हणून आधीच नकार मिळतो.’

अनिशा या विषयावर मैत्रिणींशी तावातावानं वाद घालायची. तिचं मत स्पष्ट होतं – ‘आपण जर मारे विमेन्स लिबरेशनच्या बाता मारतो, तर बायकोहून कमी पगार मिळवणारा, कमी शिकलेला नवरा असायला काय हरकत आहे? तुम्ही पोसा ना त्याला. कुणीतरी एकाने पैसे मिळवल्याशी मतलब. मला तर अगदी हाऊस-हजबंड मिळाला तरी चालेल. लग्न म्हणजे पार्टनरशिप असेल तर दोन्ही पार्टनर्सना तितकेच हक्क आणि तितकंच स्वातंत्र्य असायला हवं. युटेरस फक्त बायकांमध्ये असतं म्हणून, नाहीतर मुलं होण्याचं कामही विभागून घेतलं असतं.’ तिच्या अशा कल्पना ऐकून मैत्रिणी अवाक् व्हायच्या आणि आई काळजीत पडायची. ‘लग्न वेळेवर करून घ्या आणि मग जे काही पुढे करायचं ते करा. हवं तितकं शिका, नाहीतर परदेशी जा’, असं आईला वाटायचं. अनिशाला स्पेनला पाठवायला त्यामुळेच रिलक्टंट होती ती.

आलेल्या अनुभवांवरून मधुरानं तिच्या आईबाबांना चक्क काही अटी सांगितल्या. – मला माझ्यापेक्षा जास्त पगार असलेला, माझ्याहून मोठय़ा कंपनीत काम करणारा आणि परदेशी जाऊन आलेला मुलगा बघा. ‘आता हिला साजेसा, आखूडशिंगी बहुगुणी नवरा कुठून आणायचा? काही उपयोग नाही मुलींना शिकवून. उगीच जिवाला घोर.’.. मधुराच्या आईचा असा त्रागा बघून अनिशा आणखीनच सावध झाली. रामदास स्वामींना जसं शुभमंगल सावधान म्हटल्यावर वस्तुस्थितीची जाणीव झाली, तसं झालं तिचं काहीसं. लग्न ठरवताना जॉब, पगार, लुक्स, फॅमिली यापलीकडे जातच नाही का आपण? मुलांच्या मनात खरं काय असतं? वरून लिबरल दिसले तरी ते खरंच असतात का? आपल्या तरी नक्की अपेक्षा काय असतात त्यांच्याकडून? लग्न या विषयावर जरा अधिक  संशोधन करून मत बनवायचं ठरवलं तिनं.

चुकत होतं का काही अनिशाचं ? तिचं बरोबर, मधुराचं बरोबर की आईचं बरोबर? विचार करून कळवाल तुमची मतं? पुढच्या आठवडय़ात बोलू यावर पुढे..

viva.loksatta@gmail.com

0 comments: