Wednesday, May 17, 2017

अतुल तापकीरने एक्झीट का घेतली ?

*अतुल तापकीरने एक्झीट का घेतली ?*
लग्न ही ज्यांच्यासाठी नजरकैद आहे, पारतंत्र्य आहे, त्यांनी त्यातून लवकरात लवकर बाहेर पडलेलं बरं. मध्यंतरी साम टीव्ही चे संपादक संजय आवटे Sunjay Awate सावित्री उत्सवात म्हणाले होते, लग्न जितकं सोपं आहे, तितका घटस्फोटही सोपा असला पाहिजे.
पटत नसतानाही जोरजबरदस्तीचा मामला का ? खरं तर, स्वातंत्र्य कोणाला नको असते ? स्रीयांनाही ते हवंच असतं की...पण इथे पारतंत्र्यापेक्षा गंभीर समस्या आहे, सामाजिक सुरक्षिततेची !!! परंपरेने लादलेल्या परावलंबित्वाची !!!
नसती झंझट नको म्हणून तथाकथित प्रतिष्ठा जपण्यापायी मुलीचं लग्न उरकणारा समाज आहे आपला. अशावेळी तिच्या आवडीनिवडींना फार स्थान नसतंच. मग तीही तडजोडीची मानसिकता जोपासत जगते.
आपुलकीच्या, परस्पर आदराच्या नात्याची भावना जावून मालकी हक्काची भावना आली की तिथून घर विस्कटायला सुरूवात होते. संवाद तुटतो. दुरावा निर्माण होतो. अंतर वाढतं. पण तरीही बळेने हजारों जोडपी एका छताखाली वावरत असतात.
आपल्याकडच्या समाजव्यवस्थेनुसार तिला माहेर आधीच तुटलेलं असतं. सासर तुटू नये, यासाठी ती जंग जंग पछाडते. आपलं पुढे काय होईल, या चिंतेने भयभीत होऊन ती सहकाऱ्याला सतत दबावाखाली ठेवू पाहते. कधी जीव द्यायच्या, कायदेशीर कारवाईच्या अधूनमधून धमक्या देते. त्याचाही पुरूषी अहंकार उफाळून येत असतो. त्याच्याकडे शिवीगाळीचा, मारझोडीचा पर्याय असतो. नात्यातून बाहेर पडायच्या मानसिकतेपर्यंत परिस्थिती दोघांना घेऊन जाते. पण तिच्या पुढे फक्त अंधार वाढून ठेवलेला असतो आणि त्याला फौजदारी कारवाईची, वयोवृध्द आईवडिलांच्या ससेहोलपटीची, सामाजिक प्रतिष्ठेची चिंता असते.
इथे मनं जुळवणारी किंवा परस्पर सहविचाराने विभक्त होण्याचा सल्ला देणारी कुटुंब कल्याण केंद्रे नाहीत, तर, परत जर तक्रार आली तर ' आत टाकू ' असं धमकावणारी ' महिला तक्रार निवारण समिती ' च्या रूपात एक अपरिपक्व एकांगी, अशा विषयांच्या नाजूक पदरांच्या अभ्यासाचा अभाव असलेली संवेदनशून्य सरकारी उपाययोजना आहे.
घराबाहेर जीणं महाग, खडतर, हराम करणाऱ्या शेकडो समस्या आ वासून उभ्या असलेल्या आणि घराकडे परतावं, तर नकळत चीडचीड निर्माण करणारं विसंवादी नातं डोळ्यासमोर येतं. इच्छा नसतानाही परतावं लागतंच. टोमणे स्वागताला असतात. प्रत्येक रात्र कूस बदलत, तळमळत जाते. उलटसुलट विचार, शक्यता झोपू देत नाहीत...
या वातावरणाचा दुष्परिणाम तब्येतीवर होतो. आवडनिवड, छंद हरवत जातात आणि मनाचा, मेंदूचा ताबा वैफल्यग्रस्ततेकडे कधी जातो, थांगपत्ताही लागत नाही. या परिस्थितीत तथाकथित मित्रमंडळी समजूत काढण्यापलिकडे, थातुरमातुर सांत्वन करण्यापलिकडे काही करू शकत नाहीत. पण आतून एकच आवाज येतो....एक्झीट !!! जी अतुल तापकीरने घेतली ...
~ Rajesh Salvi

0 comments: