Wednesday, June 3, 2020

महाभारत

 महाभारत  - तत्व, तर्क व तात्पर्य 

महाभारतातील प्रत्येक पात्र आणि प्रत्येक प्रसंग ही एक शिकवण आहे तसंच त्याकडे केवळ मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून न पाहता किंवा खिल्ली न उडवता अभ्यास म्हणून पाहिलं तर हेच महाभारत आपल्याला प्रत्येक प्रसंगी मार्गदर्शक बनू शकतं, असं मला वाटतं. मी महाभारताची जाणकार नाही! एक सामान्य वाचक म्हणून कथा कादंबऱ्यांतून वाचलेल्या तसंच महाभारतावर आधारित मालिकांमधून जे समजलं, अभ्यासलं त्यातून मला जे कळलं त्यावर 'महाभारत - तत्व, तर्क व तात्पर्य' यावर या पोस्ट्स असतील. माहितगारांनी यावर जरूर प्रकाश टाकावा मात्र यावर कुठलाही वाद किंवा उटपटांग कॉमेंट्स करू नये, ही नम्र विनंती! __/\__

भाग १ - महत्वाकांक्षा 

महत्वाकांक्षेचं उग्र रूप महाभारतात पाहायला मिळतं. महत्वाकांक्षेचा अतिरेक किती विनाशी व विदारक  असू शकतो, याचे अनेक उदाहरण महाभारतात वाचायला मिळतात.

तर्क : अति महत्वाकांक्षा मत्स्यगंधा सत्यवतीने धरली. राजा शंतनूचा प्रथम पुत्र देवव्रत राजसिंहासनवर न बसता आपला व राजा शंतनूचाच पुत्र सिंहासनाचा उत्तराधिकारी व्हावा, ही अट तिने राजा शंतनूपुढे टाकली. राजा शंतनूसारखा प्रतापी पती व कुरुवंशासारखं संपन्न राजघराणं मिळत असूनही सत्यवतीच्या वडिलांना आणि सत्यवतीलाही राजसिंहासनाचा मोह सुटला नाही! सत्यवतीच्या अटीबद्दल कळताच देवव्रताने जन्मभर ब्रह्मचर्याचे पालन करण्याचे तसेच राजसिंहासनाचा कायम त्याग करण्याची प्रतिज्ञा केली. राजसिंहासन राजा शंतनूच्या प्रथम पुत्राला न मिळता आपल्याच पुत्राला मिळावं या महत्वाकांक्षेपोटी राजा शंतनूला घातलेल्या अटीची फार मोठी किंमत सत्यवतीला चुकवावी लागली. 

सत्यवतीचा मत्स्यकन्या सत्यवती कुरुवंशाची सम्राज्ञी झाली! मात्र कल्पनेपेक्षा कितीतरी पटीने जास्त मिळूनही सत्यवती कधीही सुखी राहिली नाही. राजा शंतनू व सत्यवतीचा ज्येष्ठ पुत्र चित्रगंध गंधर्वांसोबत युद्धात मारला गेला तर कनिष्ठ पुत्र विचित्रवीर्य विवाहानंतर काही काळातच टीबीने मृत्युमुखी पावला. दोघेही अल्पवयीन व  निपुत्रिक मेल्यामुळे राजसिंहासन रिक्तच राहिलं. कुरुवंशाला वारस मिळावा या हेतूने सत्यवतीने देवव्रताला विचित्रवीर्याच्या विधवा पत्नींशी, अंबिका व अंबालिकाशी विवाह करण्याबद्दल सुचवले. परंतु भीष्माने प्रतिज्ञा मोडायला नकार दिला. नाईलाजास्तव अंबिका व अंबालिका यांना पुत्र व्हावे याकरिता नियोग पद्धती अवलंबली गेली. अंबिका व अंबालिका दोघींना झालेल्या अनुक्रमाने धृतराष्ट्र व पांडू या दोन मुलांपैकी धृतराष्ट्र जन्मतःच अंध निघाला. त्यामुळे त्याला राजसिंहासनावर बसवणे नियमाविरुद्ध होते.

राजा पंडूला शापामुळे अल्पवयात मृत्यू आला. धृतराष्ट्राला कार्यकारी राजा म्हणून घोषित करावं लागलं! धृतराष्ट्राची राजा होण्याची तीव्र महत्वाकांक्षा त्याच्या मुलात, दुर्योधनात पूर्णपणे उतरली होती. त्याला धृतराष्ट्राचा व इतर भावांचा पाठिंबा होताच. तरीही पांडूपुत्र युधिष्ठिरपेक्षा वयाने लहान असल्याने त्याला राजसिंहासनावर बसवणे शक्य नव्हते. परंतु दुर्योधनाला राजसिंहासनाची महत्वाकांक्षा असल्याने त्याने ते युधिष्ठिराला कधीही प्राप्त होऊ दिले नाही. कौरव पांडवांमध्ये कायम वैर राहिलं. याच वैराचा परिणाम पुढे महायुद्धात झाला, ज्यात पाच पांडव व अभिमन्यूच्या पुत्र सोडून संपूर्ण कुरुवंशाचा नाश झाला. सत्यवतीला पश्चाताप झाला तेव्हा वेळ टळून गेली होती. आत्मचिंतन वेळीच झाले नाही तर ते निरर्थक व निरुपयोगी ठरते.

सत्यवतीने राजसिंहासनाची अती महत्वाकांक्षा ठेवली नसती, राजसिंहासन भीष्माकडे राहिलं असतं, त्याने विवाह केला असतं.. तर हे महायुद्ध कदाचित टळू शकलं असतं! धृतराष्ट्राने राजसिंहासनाची महत्वाकांक्षा न धरता मुलांना स्वकीयांबद्दल प्रेम व संस्कारांचे धडे दिले असते तरी देखील हे महायुद्ध घडलं नसतं..! महाभारतातील महत्वाकांक्षेचा अजून एक बळी म्हणजे महारथी कर्ण! या महायोद्धयाने कायम त्याच्यापेक्षा वयाने कितीतरी लहान अर्जुनाची स्पर्धा केली. आपण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ व सामर्थ्यवान आहोत आहोत, हे दाखवण्यात याने संपूर्ण आयुष्य एका अधर्मीच्या संगतीत घालवलं अन एकानंतर एक पापात सहभागी झाला!  महत्वाकांक्षा चुकीची नाही पण चुकीची महत्वाकांक्षा व त्यासाठी अवलंबलेले चुकीचे मार्ग अयोग्यच! त्याचे परिणाम कधीही संतोषजनक नसतात.

कसंही करून अभिनेत्री व्हायचंच अति महत्त्वाकांक्षेमुळे कितीतरी अभिनेत्रींचे जीवन उध्वस्त झालेत. विमी नावाची अभिनेत्री तिच्या अति महत्त्वाकांक्षेमुळे संसारावर पाणी सोडून चित्रपट सृष्टीत आली. एक दोन चित्रपट यशस्वी झाल्यानंतर एक दोन आपटले. नवऱ्याने बोलावल्यानंतरदेखील परत न जाता चित्रपट सृष्टीतच राहिली. चित्रपट निर्मात्यांकडे चकरा मारत राहिली.. एकाने फायदा घेतला..दुसर्याने बनवलं..तिसऱ्याने फसवलं..तरीही तिची महत्वाकांक्षा कमी झाली नाही! उलट ती अजूनच गर्तेत गेली. न चित्रपट मिळाले...न संसार! कधीकाळी टॉपवर असणारी एक सुंदर अभिनेत्री आपल्याच कर्माने मृत्यूसमयी बेवारस मेली.. नुसती बेवारसच नाही तर हालहाल होऊन मेली! विमीची महत्वाकांक्षा चुकीची नव्हती पण तिने अवलंबलेले मार्ग अयोग्य होते. त्याचे परिणाम तिला भोगावे लागले. अशीच कितीतरी उदाहरणं आपल्या आजूबाजूला आढळतील.  

तात्पर्य : जीवनात महत्वाकांक्षा हवीच. काहीतरी भरीव करण्याची उर्मी व ऊर्जा महत्वाकांक्षेतूनच मिळते. परंतु अति महत्वाकांक्षा मार्ग भरकटवते, लक्ष्य प्राप्तीकरीता चुकीचे मार्ग सुचवते, बुद्धीचे कवाडं बंद करते. नोकरीत बढती व्हावी याकरीता सचोटीने केलेले प्रयत्न महत्वाकांक्षा... त्याकरीता कुमार्गाने जाणे, ही अति महत्वाकांक्षा! महत्वाकांक्षी लोकं जीवनात काहीतरी भरीव कामगिरी करायचा प्रयत्न करतात, शिकत राहतात, आत्मसात करत राहतात, टीकांना सकारात्मक घेतात.. अति महत्वाकांक्षी लोकं दुसऱ्यांना तुच्छ समजतात. त्यांना काही शिकवायला गेल्यास त्यांना तो त्यांचा अपमान वाटतो.. आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हे कोणताही मार्ग अवलंबायला मागेपुढे पाहत नाहीत. सत्यवती, धृतराष्ट्र, दुर्योधन ही अति महत्वाकांक्षेचेच उदाहरण आहेत. आपल्याला कोणत्या गटात रहायचे, आपल्या पुढील पिढीला कोणता मार्ग दाखवायचा, हे आपणच ठरवायला हवे!

आसावरी इंगळे
(३ जून, २०१८)

0 comments: