Saturday, February 26, 2022

वपु

स्वत:चेच सांत्वन स्वत:चे करायची वेळ आली कि समजावे एकटेपणाचे ढग आपल्यावर घुमू लागलेत.
आभाळ शांत झालंय.निरभ्र झालय.फिकट झालंय…
पण आभाळ कधी एकाच रंगावर स्थिर राहिलंय का?
ढग येतात,जातात, वादळं उठतात,आभाळ काळवंडून येतं, पाउस पडतो...

रंगांची उधळण सर्वात जास्त कोण करत असेल तर ते म्हणजे आभाळ नि
भावनांच्या रंगांची सर्वात जास्त कोण करत असेल तर ते म्हणजे माणसाचे मन.
माणूस कधी कधी पूर्ण भरलेला असतो तर कधी पूर्ण रिता असतो.दोन्ही स्थितीत चंचलता असते.या दोघांच्या मध्ये असते ते स्थैर्य.

जास्त असले कि ते गमावू हि भीती आणि कमी असले तर काहीच नाही हि कुरकुर.या गोष्टी शांत जगू देत नाहीत.
स्थैर्यात जगणारी माणसं तशी कमीच असतात.सापडतात ती हि वृद्ध झालेली, काही वयाने तर काही मनाने.
बहुतेकदा घालवलेल्या आयुष्यात काही चुका आपण किती नकळत केल्या आणि उगाच केल्या याचा उलघडा झालेली....
आता त्यावर काहीच उपाय नाहीयेय,वेळ निघून गेलीय अशी जाणीव झालेली...आणि म्हणून शांत झालेली....

जन्मासोबत प्रवास सुरु होतो,सुरु केलेला प्रवास कुठे संपणार हे माहित नसतं...वाटा-वळणे घेत घेत आयुष्य अश्या ठिकाणी आणून सोडतं कि ज्याचा स्वप्नातही कधी विचार केला नव्हता....
क्षणाक्षणाला क्षण रंग बदलतो,आयुष्य कात टाकतं...सुख असो वा दु:ख.ते त्या क्षणासोबत क्षणाने जुनं होत जातं...

आयुष्य हे मानवी अंदाजाच्या मुठीत कधीच मावले नाही...ते विशाल असतं...समजायला उमजायला कठीण.....
व. पु....

#वपु #vapu


0 comments: