Friday, May 24, 2013

मी अद्वैताची प्रचिती.






 मी अद्वैताची प्रचिती..

मी अथांग आकाशाची व्यापून निळाई सारी
मी तेजाची देहावर लेऊन झळा सोनेरी
होऊन हवा भिरभिरती मी पाण्यावर थथरते
त्या महाभूतांच्या हृदयी मी स्पंद होऊनी रूजते

मी चाहुल ऋतूराजाची, कोकिळ मजसंगे गातो
त्या स्वर्णालंकारांनी मोहरून आम्रही न्हातो
मी येता तरु-वेलींना लोभस बाळसे धरते
मी भरात येता सार्‍या सृष्टीला येते भरते

मी यौवन सळसळणारे धुंदीतच रमते वेडी
मी गाणे घमघमणारे, सारंग कधी मी तोडी
मी गुंफ़त, आळवित जाते लडिवाळ मनाच्या ओळी
कधि होत व्यथा राखडी, कधि रंगाची रांगोळी

मी संध्या केशर भरली, क्षितिजाशी मंतरलेली
मी रात्रीची शितलता, दश-दिशांत पांघरलेली
पक्ष्यांची किलबिल घेउन, मी पहाटेस अवतरते
मी अद्वैताची प्रचिती, मी डोळ्यातुन पाझरते

तो विश्वाचा निर्माता, मी रूप आगळे त्याचे
मज दिलेस तू सौंदर्य अन पाशही कर्तव्याचे
मी झटले, लढले, मिटले कर्तव्या-पूर्तीसाठी
मी बंध उभ्या जन्माचे बघ सोडून आले पाठी

- प्राजु

0 comments: