Friday, September 12, 2014

जमला जन समुदाय अपार

वैराग्याचा मेळा(गमन)

जमला जन समुदाय अपार, मूक, उदास, गंभीरं
कोणी उधळती अबीर बुक्का, कोणां मुखी रामं

राग, लोभ, नाती, गोती, काम, क्रोध न उरला काही
सर्व संग परित्याग करुनी, निजला जणूकि संन्यासी

आयुष्य भर जो दिसला, तो देह समोरी निजला
सोडून गेला जो देहाला, तोच कधी ना दिसला

अज्ञाताच्या या प्रवासाला, आत्मा नंगाच गेला
तिरडीवती केवळ पसरला, देह रुपी हा अंगरखा

जमविला गोतावळा जरी, सारे प्रवासी घडीभरचे
अज्ञाताच्या या वाटेवर, अखेर एकटेच निघायचे

असतील अनेक जरी, सखे, सोयरे मित्र, सोबती
संपणार रे साथ तयांची, स्मशान प्रवेश द्वारी

सारे प्रवासी घडीभरचे, पाव्हणेच रे या जगी
काढले तिकीट परतीचे, जन्मा आलो ज्या क्षणी

ना रद्द व्हायचे तिकीट, ना गाडी कधी चुकायची
परतीच्या प्रवासाची ती, वेळ कधी न टळायची

उगवतील चंद्र तारे, चालेलच जग रहाटी
राहतील अंधुक आठवणी, भिंतीवर फोटो जोवरी

मृत्यूचीच असे ओढ जीवा, तोच शाश्वत मित्र त्याचा
भेटता देती आलिंगन दोघे, जीव तत्काळ सोडी काया

चिंतेनी किती जाळला देह, न जळला आयुष्य भरी
होता मुक्त चिंतेतून, तो देह जळला चितेवरी

राखले शरीर जन्मभरी हे, राख करण्याच स्मशानी
राख पसरता मनावरी ती, राखण्याची जिरली उर्मी

धडाडून पेटली चिता, वैराग्य धूर उडाला
कोण म्हणे ही अंत्ययात्रा, जमला वैराग्याचा मेळा

केदार....
(माझ्या "गमन" ह्या संग्रहातून)
https://www.facebook.com/kedar.mehendale.3

0 comments: