माणसं, 'माणसं' केव्हा होतात? त्यांना एकमेकांना सांगावसं वाटतं, त्या वेळी ! "मनुष्य संपला"- असं आपण कधी म्हणतो? कोणाशी काही बोलावसं वाटत नाही - असं ज्या दिवशी वाटतं, त्या दिवशी मनुष्य संपला असं समजावं. मग त्याचं साठावं वर्ष असो वा पंचविसावं असो - त्यात काही फरक नाही.
पु. ल. देशपांडे
उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीवर पहिला पाऊस पडला की ती तापलेली माती जी गंध घेऊन उठते त्याला तोड नाही. एका खोलीत बसून तो घ्यायचा नसतो. तो अनपेक्षित रीतीने यावा लागतो आणि तो वास घेताना उघड्यावर जाऊन तृप्त धरतीची तृप्तीही डोळे भरून पहावी लागते.
पु. ल. देशपांडे
"मी हसतो, मलाच हसतो. माझे वाचकप्रेक्षकही मग मला हसतात आणि एकाएकी त्यांच्या लक्षात येतं की, आपण स्वतःलाच हसत आहोत. समाजाच्या एकूण तब्येतीस ते बरं असतं. माझ्या लेखनातून एवढंच हाती लागावं, ही अपेक्षा. नेपोलियननी जोसेफाइनला म्हटलं, "मी तुझ्यावर प्रेम करतो, परंतु मला तुझ्यावर याहून शतपटीने प्रेम करायचं आहे"- मलाही म्हणावंसं वाटतं, "मी साहित्यावर प्रेम करतो, परंतु मला साहित्यावर अजून शतपटीनं प्रेम करायचं आहे!"
पु. ल. देशपांडे
पुस्तकांचा संग जडलेल्या माणसाला कधी एकटं राहावं लागत नाही. खूप थोर माणसं त्याच्याशी संवाद साधायला त्याच्या पुस्तकांच्या कपाटात पाठीला पाठ लावून उभी असतात.
पु. ल. देशपांडे
हसून खेळून आयुष्यातली दुःखे कमी करीत जगण्याची संधी असताना आपणच आपली आयुष्ये रागाने मलीन करीत असतो. राग येणे आपल्या हाती नसेल पण तो वाढीला न लागू देणे आपल्याच हाती असते. आपल्या अडचणी किंवा दुःखे व्यक्त करायच्या जागा माणसाला फार थोड्या लाभतात. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसे याच त्या जागा.
पु. ल. देशपांडे
आंघोळ ही देखील भुकेसारखी लागावी लागते. उठल्याबरोबर आंघोळ उरकायची ही नुसतीच सवय झाली. त्यात जाणीवयुक्त सौख्य नाही. साऱ्या शरीराचा जेव्हा 'आम्हाला आंघोळ घाला' असा रंध्रा रंध्रातून मुक आक्रोश सुरु होतो त्यावेळी घडते ते स्नान. एरवीचे अंग विसळणे झाले.
पु. ल. देशपांडे
नव्या वर्षाचं नवंपण ह्या जुन्या गळून गेलेल्या पानांच्या जागी नवी पालवी फुटणाऱ्या दृढ विश्वासात आहे. मनाच्या काचेवर गेल्या वर्षातल्या निराशांची धरलेली काजळी नव्या वर्षाच्या पाडव्याच्या दिवशी पुसून टाकली पाहिजे. दिवस दिवसांसारखेच असतात, पण एकाच स्त्रीनं आज हे नेसावं, उद्या ते नेसावं, आज ही फुलं माळावीत, उद्या ती फुलं माळावीत आणि कालच्यापेक्षा आज आपलं आपल्यालाच निराळं वाटून घ्यावं; तसंच दिवसांनाही आज पाडवा म्हणून नटवावं, उद्या दसरा म्हणून, परवा दिवाळी म्हणून. आपण आपल्या त्याच खोलीतली खाट एकदा इकडे आणि एकदा तिकडे ठेवून खोली निराळी करतो, तसं तेचतेच दिवस निराळे करणं आपल्या हातात आहे. फक्त झाडांना फुटते, तशी नवी पालवी मनाला फुटली पाहिजे.
पु. ल. देशपांडे
एखादी गोष्ट काव्यमय आहे असं आपण म्हणतो, त्या वेळी त्याचं यमक-प्रास-वृत्त काहीही आपण पाहत नसतो. एखाद्याचं वागणं काव्यमय आहे, असं आपण म्हणतो - एखाद्याचं दिसणं किंवा एखादीचं दिसणं काव्यमय आहे असं आपण म्हणतो. काव्याशिवाय आपण राहू शकत नाही याचं कारणच असं आहे, की अन्न आपल्याला जगवतं आणि काव्य आपल्याला जगायला कारण देतं. कशासाठी जगायचं? जगायचं याच्यासाठीच, की जिथे माणसामाणसांतला प्रास जुळला आहे, माणसामाणसांतलं वृत्त जुळलं आहे - ह्याच्यासाठीच तर जगायचं! म्हणूनच 'आधी वंदू कवीश्वर। जे शब्दसृष्टीचे ईश्वर' असं म्हटलं आहे.
पु. ल. देशपांडे
पुस्तक वाचणारा माणूस हा जीवनात आनंदाच्या,
ज्ञानाच्या किंवा गेला बाजार इतरांना कसलाही उपद्रव
नसलेल्या विरंगुळ्याच्या शोधात असतो. पाचपन्नास
पानं वाचल्याशिवाय दिवस न घालवण्याची सवय
मला अगदी लहानपणापासूनंच जडली ती आजही
सुटली नाही. काहीतरी वाचल्याशिवाय दिवस गेला
तर, अंघोळ न करता गेलेल्या दिवसासारखं मला
वाटतं आणि अंघोळ करताना जसं आपण आपलं
आरोग्य चांगलं राहावं हा विचार मनात बाळगून अंघोळ
करतो असं नाही, अंघोळ या गोष्टीचाचं आनंद असतो
तसंच वाचनाचं आहे. कुठलं पुस्तक कुठल्या प्रकारचा
आनंद देऊन जाईल ते सांगता येत नाही.
पु. ल. देशपांडे
मला पाह्यला आवडतात माणसे ! सकाळी उठून पर्वतीला फिरायला जाणारी माणसे - विशेषतः पेन्शनर मंडळी, त्यांच्यामागून जावे. रोज सकाळी न कंटाळता उठणारी, न कंटाळता स्वतःला लोकरीत गुंडाळून घेणारी आणि न कंटाळता आपली विटयाहून अष्टट्याला बदली झाली, तेव्हा काय गंमत झाली ते सांगणारी ! ह्या म्हाताऱ्या माणसांसारखीच प्राथमिक शाळेतली पोरे शाळा सुटल्यावर गटागटांनी जातात तेव्हा त्यांच्याहीमागून त्यांच्या नकळत जाण्यात विलक्षण आनंद असतो ! ज्याला विशेष काही बोलायचे असते तो मुलगा त्या गटाच्या पुढे येऊन रस्त्यात उलटा उलटा जात असतो. दहा मिनिटे त्यांच्यामागून चालावे; विषयाचा पत्ता लागत नाही, पण सगळी तोंडे हलत असतात. त्यातून मग त्या गटाच्या चार पावले मागे राहून चालणाऱ्या चिमण्या सखूबाई-साळूबाईंचे काही विशेष हितगूज चालू असते. चालताचालता थांबून उगीचच एकमेकींच्या कानांत काही तरी गुप्त गोष्टी सांगितल्या जातात. 'अगदी कंठाशप्पत' म्हणून गळ्याला चिमटा काढला जातो - आणि पुन्हा वाटचाल सुरू होते !
पु. ल. देशपांडे
I do not like being called a humorist. I don't sit down to manufacture humour. I write the way I love to write, and I am grateful to my readers when they notice the hidden tear. For me humour is a wonderful armour. I have used it occasionally as a weapon, but I have taken care to see that it does not hit anyone below the belt. Unfortunately, some people wear their belt a little too high! The humour that hurts is ugly, and art abhors ugliness.
पु. ल. देशपांडे
साहित्य, संगीत आणि नाटक मला ह्या तिन्ही कलांतून जो अनुभव मिळाला. जी जीवनदृष्टी मिळाली. मनावर चढणारी काजळी जी वेळोवेळी पुसली गेली, त्याचं कारण, माझा ह्या कलांशी जडलेला संग ! आणि जे मला लाभलं ते इतरांनाही लाभावं ह्या एका हेतूने मी ही निर्मिती करायला लागलो. एक तीळ सात जणांनी वाटून खावा म्हणतात तसं जे मला तिळ तिळ लाभत गेलं ते मी वाटलं! तिळापासून होतं ते तेल. तेलाला स्नेह म्हणतात. ह्या वाटपातून तुमचा-आमचा जो स्नेह जडला, तीच माझी कमाई!
पु. ल. देशपांडे
ज्या भाषेचे संस्कार तोंडावाटे शब्द फुटण्याच्या आधी आपल्या कानांवर झाले, त्या भाषेची नाळ ही नुसती कानाशी जुळलेली नसते, प्राणाशी जुळलेली असते.
पु. ल. देशपांडे
शरीरातून रक्त वाहावं तशी आपल्या व्यक्तिमत्त्वातून भाषा वाहत असते, तो प्रवाह थांबवणं अशक्य असतं. आईच्या दुधाबरोबर शरीराचं पोषण होत असताना तिच्या तोंडून येणा-या भाषेनं आपल्या मनाचं पोषण होत असतं. केवळ देहाच्या पोषणानं माणसाचं भागत नाही. किंबहुना मानव म्हणजे ज्याला मन आहे तोय मन एव मनुष्यः अशी योगवासिष्ठामध्ये माणसाची व्याख्या केलेली आहे. या मनाचं पोषण भाषा करत असते. त्या पोषणाचे पहिले घास ज्या भाषेतून मिळतात, ती आपली भाषा.
पु. ल. देशपांडे
ज्या राज्यात अन्यायाचा निःपात होईल, पापी माणसाला शासन होईल, शीलाचा सन्मान होईल, चारी धामाच्या तीर्थयात्रा सुखरूप पार पडतील, ज्याचा जो देव असेल त्याची उपासना तो तो निर्वेधपणे पार पाडील, शेतातल्या धान्याला शत्रूचा धक्का लागणार नाही आणि माताभगिनींच्या हातची कंकणं अखंड किणकिणत राहतील, असल्या शांतितुष्टिपुष्टियुक्त राज्याचे स्वप्न शिवरायांनी पाहिले.
पु. ल. देशपांडे
'हो'काराला सामर्थ्य नाही; 'न'काराला आहे. आपली आवड व्यक्त करणे हा भाबडेपणा झाला. नावड सांगण्याने व्यक्तिमत्त्वाला झळाळी येते.
पु. ल. देशपांडे
महागाईवर चर्चा चालू असताना पु.ल. आपल्या मित्राला म्हणाले, “या महागाईत टिकून राहायचं असेल, तर 'आर्थिक जादू' आत्मसात करायला हवी. हे आधुनिक अर्थशास्त्राचं एक तत्त्व आहे. पत्नी जेवढं खर्च करते त्यापेक्षा अधिक कमावणे या किमयेला 'आर्थिक जादू' म्हणतात!
पु. ल. देशपांडे
मन नेहमी मागेच पाहण्यात रमते. आयुष्याच्या ह्या प्रवासात कितीतरी माणसे भेटली. नात्याची बिननात्याची. कुणी पोटापाण्याच्या व्यवसायात भेटली. कुणी मैफिलीत भेटली. कुणी प्रवासात भेटले. कुणी शेजारी म्हणून लाभले. कुणी आळीतले आळीकर, कुणी गावातले गावकर. कुणी जवळ आले, कुणी खेचून जवळ घेतले. काहींचे आकर्षण वाढले, काहींचे अचानक कमीही झाले. काही माणसे पुनर्भेटीत निराळीच वाटली. काहींच्या व्हेवलेंग्थ पटकन जमल्या, काहींच्या नाही जमल्या. काहीनी कधीही न फेडता येणाऱ्या ऋणांचा भार अलगद खांद्यावर ठेवला. प्रत्येकाला हे असे कधी कधी जवळीक तर कधी दुरावा अशा हेलकाव्यात तरंगणारे गणगोत लाभतच असते. माणूस कधीच एकटा नसतो. त्याने तसे असूही नये.
पु. ल. देशपांडे
0 comments:
Post a Comment