Monday, May 23, 2011

मराठी अस्मिता जोपासणारे शिकागोचे अधिवेशन

मराठी अस्मिता जोपासणारे शिकागोचे अधिवेशन
-
जुलै २१ ते २४ २०११ दरम्यान शिकागो येथे भरणारे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १५ वे द्वैवार्षिक अधिवेशन, आता फक्त काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. अमेरिका आणि कॅनडा या दोन देशांमध्ये वास्तव्य करणाऱ्या समस्त मराठी जनांचे हे संमेलन, म्हणजे भारताबाहेरचे सर्वात मोठे मराठी अधिवेशन असे म्हणल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही.

सुमारे पन्नास वर्षांपासून अमेरिकेत स्थलांतरित होऊ लागलेली मराठी कुटुंबे, गेल्या दशकात फार मोठ्या संख्येने अमेरिकेत आली. गावोगावी असलेल्या मराठी मंडळांमध्ये उत्साहाचे एक नवीन वातावरण निर्माण झाले. पूर्वीपासून इथे राहणाऱ्यांना या नव्या पिढीची अनेक कारणांसाठी अपूर्वाई वाटली. काही बाबतीत ही मंडळी मॉडर्न असली, तरी मराठी भाषा आणि संस्कृती त्यांना तितकीच प्रिय आहे हे पाहून जुनी पिढी हरखली. अधिवेशनाचा विडा उचलण्याचा विचार करताना असाच काहीसा अनुभव आम्हा शिकागोकरांना आला. मुळात बृहन्महाराष्ट्र मंडळ हे शिकागोमध्येच उगम पावलेले आहे आणि मंडळाचे पहिले अधिवेशनही इथेच संपन्न झाले होते. १९८१ मध्ये स्थापन झालेल्या मंडळाच्या तिसाव्या वर्धापनदिनी, हे अधिवेशन पुन्हा एकदा शिकागोला भरणार हे निश्चितच औचित्यपूर्ण आहे.

अमेरिकेत अशा प्रकारचे अधिवेशन भरविणे ही सोपी गोष्ट नाही ह्याची जाणीव असूनही केवळ उत्स्फूर्तपणे पुढे आलेल्या स्वयंसेवकांच्या जोरावर आम्ही हे अधिवेशन भरवण्यास प्रवृत्त झालो. मी गेली बरीच वर्षे शिकागोचा रहिवासी आहे. महाराष्ट्र मंडळाच्या शिकागो कार्यकारिणीमध्ये स्वयंसेवक, अध्यक्ष, विश्वस्त असा सर्वांगीण अनुभव आणि मुख्य म्हणजे इथल्या वास्तव्यात मिळालेले जिवाभावाचे मित्र एवढ्याच शिदोरीवर खरेतर ह्या कार्याला हात घातला. पण अधिवेशन शिकागोला होणार, अशी अधिकृत घोषणा झाली आणि अनेक तरुण मंडळी अतिशय उत्साहाने आणि उमेदीने अधिवेशनाच्या विविध समित्यांवर कार्यरत झाली.

जवळजवळ पन्नास मैलांच्या परिघात वसलेला शिकागो मधला समस्त मराठी समुदाय एकत्रितपणे आणि एकदिलाने आपल्याला जमेल ती जबाबदारी घेण्यास सिद्ध झाला. माझ्या दृष्टीने अधिवेशनातली ही सर्वात जमेची बाजू. तरुणांच्या उत्साहाला अनुभवी लोकांचे मार्गदर्शन आणि एकमेकांना जवळून ओळखणारी अनेक मंडळी हा मेळ जमणे अतिशय आवश्यक आहे, ही जाणीव झाली. अर्थात इथले मराठी बांधव सारेच हुशार, उच्च शिक्षित काही बाबतीत सर्वज्ञ! त्या सर्वांना एखाद्या निर्णयाप्रत आणताना कोणाचा उपमर्द किंवा मानभंग होणार नाही याची काळजी घेणे हे सर्वच समिती प्रमुखांनी लक्षात ठेवले. त्यामुळे एकंदरीत लाभलेले सगळ्यांचे उत्तम सहकार्य आणि वाढता उत्साह लाभला. आमची सर्वांची एकजूट आम्हाला आमच्या ध्येयाप्रत नेणार हे निःसंशय.

आपापले उद्योग आणि व्यवसाय सांभाळून फावल्या वेळात म्हणजे बहुतांशी वीकेंडलाच काम करणे शक्य असल्याने, गेली दोन वर्षे हा उपक्रम सुरु आहे.अधिवेशनाला जगभरातून येणाऱ्या मराठी बांधवांसाठी हा एक आनंद सोहळा असेल अशी आमची अपेक्षा आणि तयारी आहे. डॉ. अनिल काकोडकर, श्री. रत्नाकर मतकरी, शोभा डे, मीना प्रभू, श्रेयस तळपदे इत्यादी मान्यवर व्यक्ती अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. "मराठी बाणा" हा मराठी कला आणि संस्कृतीचा मानबिंदू ठरलेला सुमारे ८० कलाकारांचा रंगमंचावरील अभूतपूर्व आविष्कार शिकागोच्या अधिवेशनात साकार होणार, ही तर श्रींची इच्छा! शिवाय गिरीश जोशी लिखित नवे कोरे नाटक "लव्ह बर्डस" आणि अमेरिकेतल्या कलावंतांचे अनेक मनोरंजक कार्यक्रम होणार आहेत. शिवाय व्याख्याने, चर्चासत्रे, लेखक मेळावा, उद्योजक परिषद, विक्रेत्यांचे प्रदर्शन आणि विक्री केंद्रे, यांचा अंतर्भाव असलेले असे हे भव्य अधिवेशन असेल. मिशिगन महासरोवराच्या किनारी असलेले McCormick Place Convention Center हे अधिवेशनाचे स्थळ आहे. वेबसाईट : bmm2011chicago.org

- नितीन जोशी, प्रमुख संयोजक,
niteen.joshi@bmm2011chicago.com

0 comments: