Friday, March 2, 2012

आनंदाचे गीत स्फ़ुरावे सरणावरती जाता जाता

खंत नसावी, ताण नसावा, श्वासांवरती, जाता जाता
आनंदाचे गीत स्फ़ुरावे सरणावरती जाता जाता

धगधगणारी आग शमावी दाह नुरावा शीतलतेने
त्या राखेतुन बाग फ़ुलावी, दरवळ भवती, जाता जाता

जे असते ते भोगुन घ्यावे, सोडुन द्यावे, विसरुन जावे
अर्पण सारे येथे ईथले, ओंजळ झरती, जाता जाता

प्राणपणाने प्राणार्पण हो, जीवनधारा ही सरताना
... व्याकुळ व्हावे अंबर सारे, व्याकुळ धरती, जाता जाता

"त्या" वाटेच्या ह्या वळणावर आज नव्याची नीव धरावी
ब्रम्हांडातुन शून्य उरावे? सागर भरती, जाता जाता

सुरुचि नाईक
८/०२/१२

0 comments: