Monday, March 23, 2020

कोरोना बद्दल

अखेरचा निरोप घेताना... 
#जनता_कर्फ्यू  #युद्ध_कोरोनाशी

डॉक्टर फ्रास्न्सिस्का कोर्टेल्लारो सांगत होते,  
"तुम्हाला माहिती आहे का एका डॉक्टरसाठी सर्वात हृदयद्रावक गोष्ट कोणती? पेशंटला एकट्याने मरताना पाहताना.  आयुष्याच्या शेवटी मुलांना, नातवंडांना एकदा पाहायला मिळावे म्हणून हात जोडून दयेची भीक मागताना.  कोरोनाग्रस्त रुग्ण (Covid-19 Positive) एकट्याने येतात. कोणी सोबत नसते मदतीला... जवळचे नातेवाईक सुद्धा. 

ही एकाकी लढाई लढत असताना, कोरोनाग्रस्त रुग्णांना अखेर हे कळून चुकते की आता निरोप घ्यायची वेळ आली आहे. एक बरं की, त्याची शुद्ध लगेच हरपत नाही. ते संपत जातात पण हळूहळू. पुरेसा वेळ असतो त्यांच्याकडे विचार करायला... शेवटी काय करावं!  

आज रात्री, ती अशीच शेवटची पेशंट होती.  एक आजीबाई... तिला नातीला एकदा डोळेभरुन पाहायचं होतं जाण्यापूर्वी.  मी खिश्यातून फोन काढला आणि विडियो कॉल लावला. नातीसह घरातल्या सर्वांनी तिला गुडबाय केलं. कॉल संपल्यावर थोड्याच वेळात तिने अखेरचा श्वास घेतला. 

माझ्याकडे आता अश्या विडियो कॉलची मोठी लिस्ट झाली आहे..... माझ्याकडील 'अखेरच्या निरोपांची यादी' !

मला आशा आहे की ते (प्रशासन) निदान छोटे आय-पॅड देतील.  ३-४ मिळाले तरी पुरेसे होतील, त्यांना एकटं मरण्याआधी अखेरचा निरोप घेण्यासाठी."

आता हे वाचून, तुम्हाला अजूनही तक्रार आहे का? की  प्रशासनाकडून सर्व व्यवहार बंद पाडून तुम्हाला उगाचच डांबून ठेवलं जाताय. घरात बसून तुम्हाला जाम बोअर झालंय?

उगाच त्रागा करण्याआधी ध्यानात ठेवा, ही निर्णायक लढाई आहे एका दिसू न शकणार्‍या अज्ञात शत्रूशी... 

(स्वैर अनुवाद)
- समीर दरेकर 
#IndiaFightsCorona #VideoCallForPatients

0 comments: