Saturday, March 7, 2020

मराठी बोला चळवळ १

तारक मेहता.." नावाच्या कधीच न पाहिलेल्या मालिकेच्या "मुंबईची भाषा कोणती?" या वादावर काही निरीक्षणे.

१) अनेक लोक याला विरोध करायला सरसावले. अनेक मराठीप्रेमींनी हा विषय समाज माध्यमांत उचलून धरला आणि त्याबद्दल चीड व्यक्त केली हे चांगले लक्षण आहे. लोक आता अधिक सजग होत आहेत हे उल्लेखनीय आहे.

२) निर्मात्याने निवेदन देताना "मी महाराष्ट्रीय गुजराती आहे, सर्व भाषांचा आदर करतो."  असा फापट पसारा मांडला पण माफी सोडा साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही. 'मालिकेतील तो भाग पुन्हा चित्रित करून चूक सुधारू.'  हे तर लांबच. हा माज का येतो? कारण आपण यांना आधीपासून "मराठीच हवी." असं स्पष्ट शब्दांत न सांगता अतिसहिष्णुपणे यांच्या भाषेत व्यवहार करत गेलो. 

३) (अजूनपर्यंत तरी) राजकीय पक्षांमध्ये मनसे आणि मराठी कालावंतांपैकी सुबोध भावे यांनीच या विषयावर भूमिका मांडली. बाकीच्यांना निवडणुका आणि चित्रपट येणार असतील तेव्हाच का मराठी आठवते?  मराठी हा सर्वपक्षीय आणि सर्व कलावंतांचा मुद्दा असायला हवा हे आपण मराठी लोकांनीच यांच्या डोक्यात बसवायला हवं आणि त्यासाठी मराठी एकगठ्ठा मते किंवा मराठी मनोरंजनाचा प्रेक्षक निर्माण व्हायला हवा. 

४) आपण जर या मालिकेतील नट आणि निर्माते यांच्याकडून कोरडी माफी लिहून घेतली आणि उद्या परत यांच्याच मालिका पाहणार असू, तर त्याला काहीही अर्थ नाही. 
या मालिका पहाणे बंद करणे हाच एकमेव उपाय करायला हवा. 

५) चेन्नईची भाषा तामिळ पण मुंबईची मराठी असं का म्हटलं नाही याचा आपण जरा अधिक गंभीरपणे विचार करायला हवा.  आज व्हाट्सअप फेसबूक ट्विटरवर उर बडवून आपण या संवादाला विरोध केला आणि उद्या घराबाहेर पडल्यावर बसमध्ये, ट्रेनमध्ये, रिक्षावाले, भाजीविके, फळविके यांच्याशी मराठीतच बोलणार नसू तर "मुंबईची भाषा मराठी नाही हे आपणच सिद्ध करत नाही का?" 

त्यामुळे फक्त मराठी मनोरंजनाला प्राधान्य आणि फक्त मराठीत व्यवहार करणार असा निर्धार सुद्धा करायलाच हवा तर येत्या काळात परिस्थिती बदलताना दिसेल.

- चंदन तहसीलदार


0 comments: